ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पण आता राज्यातील पाऊस दिलासा देण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणतील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर उर्वरित राज्याच्या इतर भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याने विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. या भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. इतर विदर्भाच्या इतर भागात देखील पावसाची उघडीप राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. राज्याच्या इतर भागात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. पण राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत नाही. उद्याही राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर पावसाचा शक्यता नाही.