पुणे : राज्यात सध्या सत्तासंघर्ष आहे. शिवसेना धनुष्यबाणावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी महाराष्ट्रात राज्य सरकार अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न विचारून शिंदे सरकारला जाब विचारला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना राज्याचे मुख्यमंत्री बंडखोरांच्या मतदारसंघात दौरे करण्यात व्यस्त होते, असेही ते म्हणाले.
“महाराष्ट्रात बेकायदेशीर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. नव्याचे नऊ दिवस आता संपतील, मग संपतील, सरकारी कामे गतीने सुरू होतील, या सर्वांची सामान्य जनता वाट पाहात होती. अशातच राज्यात अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अतिवृष्टीमुळे सुमारे २२ लाख हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री बंडखोरांच्या मतदारसंघात दौरे करण्यात व्यस्त होते. विमान थांबवून मी कसा भारी, अशा वल्गना करत फिरत होते.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी केली आहे.
“राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत होते. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी वेळोवेळी केली होती. मात्र या सरकारने हेक्टरी फक्त १३ हजार ६०० रुपये इतकी मदत जाहीर केली. आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.” असेही ते म्हणाले.
“हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या भाषणातून सांगतात. पण या बेकायदेशीर सरकारने राज्यातील १३ कोटी सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले. मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस सतत दिल्ली वाऱ्या करत होते. पण राज्यासाठी विशेष पॅकेज आणण्यात शिंदे-फडणवीस सरकार फेल ठरले. केंद्र सरकारच्या पथकाने अवकाळी व पूरस्थितीची पाहणी करूनदेखील राज्यासाठी विशेष पॅकेज दिले नाही.”
असा हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील अनेक प्रश्न ऐरणीवर असताना हे सरकार फक्त विरोधी पक्षावर कुरघोडी करण्यात आघाडीवर राहिले आहे. राज्यात नेमके कोण सत्तेत आहे? ५० खोके घेऊन ओके झालेले मिंधे सरकार? ये बिक गई है गव्हर्मेंट ! शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र निषेध ! असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.