कोल्हापूरचा गूळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गुळाला परदेशातही मागणी आहे. गूळ व्यवसायाकडे कोल्हापूरची मदर इंडस्ट्री म्हणून पाहिले जाते. कोल्हापूरच्या शेतकर्यांनी कोणतीही शासकीय मदत नसताना गूळ उत्पादनात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे हंगामात 600 मेट्रिक टन गूळ सातासमुद्रापार जात आहे.
कोल्हापूरचा गूळ हे पारंपरिक उत्पादन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात गुर्हाळघरे आहेत. चवीच्या बाबतीत कोल्हापुरी गुळाचा गोडवा सर्वांनाच आकर्षित करत असतो. स्थानिक बाजारपेठामंध्येही मोठ्या प्रमाणात गुळाची मागणी वाढली आहे. शेतकर्यांनी स्वत:च्या हिमतीवर हा उद्योग सुरू केला आणि वाढविला देखील. स्थानिक बाजारपेठामंध्ये पूर्वी गुळाचा एक हंगाम असायचा. या हंगामातच बाजार समितीमध्ये गुळाची आवक आणि सौदेदेखील होत होते. आता मात्र बारा महिने गुळाचा हंगाम सुरू असतो. यामुळे हा उद्योग आता वाढीस लागल्याचे स्पष्ट होते.
कोल्हापुरी गुळाला परदेशात मागणी आहे. विशेषत: अमेरिका, लंडन तसेच आखाती देशामध्ये गुळाला मागणी आहे. पूर्वी 30 किलो वजनाचे गूळ रवेही पाठविले जात होते. पण अलीकडच्या काळात 1 किलोच्या रव्यापासून ते 10 किलोच्या गूळ रव्यापर्यंतच गूळ निर्यात केला जातो. या देशांमध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात. तेथे देखील भारतीय सण-समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करतात. त्यामुळे कोल्हापुरी गूळ ते आवर्जून मागतात. त्यामुळे या गुळाला परदेशात मोठी मागणी आहे. हंगामात सुमारे 600 मेट्रिक टन गूळ परदेशात पाठविला जातो.
गुळाची उलाढाल
2016-17 219 कोटी 45 लाख 6 हजार 700 रुपये
2017-18 226 कोटी 26 लाख 93 हजार 150
2018-19 210 कोटी 21 लाख 22 हजार 300
2019-20 212 कोटी 51 लाख 29 हजार 800
2020-21 235 कोटी 40 लाख 90 हजार