अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट आणि वाढत्या आद्रतेमुळे यंदा महाराष्ट्रातील हापूस (Alphonso) उत्पादनात ३० ते ३५ टक्क्यांची घट झाली असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. आंब्यांसाठीची मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई बाजारातही आंब्याची (Mango)आवक घटली आहे. राज्यातील बहुतांशी बाजारात यंदा आंब्यांची आवक कमी आहे. ४ ते ५ डझन आंबे असलेली पेटी आकार आणि गुणवत्तेनुसार २ ते ५ हजारांना विकल्या जात आहे. बिजनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. गेल्यावर्षी मुंबईच्या वाशी बाजारात दिवसाकाठी ५० हजार बॉक्स दाखल होत होते, यावर्षी दिवसाकाठी केवळ ४५ हजार बॉक्स दाखल होत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
आंब्यांसाठीची मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई बाजारातही आंब्याची आवक घटली आहे. राज्यातील बहुतांशी बाजारात यंदा आंब्यांची आवक कमी आहे. ४ ते ५ डझन आंबे असलेली पेटी आकार आणि गुणवत्तेनुसार २ ते ५ हजारांना विकल्या जात आहे.
उत्पादन घटल्याने या उन्हाळ्यात आंब्यांच्या (Mango) किंमती ३५ ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. प्रतिकूल हवामानामुळे उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल या काही प्रमुख आंबा उत्पादक राज्यांतील उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आंबाप्रेमींना या आंबा हंगामात जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
आंब्याला मोठी मागणी असून आंब्याचे दर तसेच राहणार असल्याचे माल्दा आंबा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उज्जल सहा यांनी म्हटले आहे. हवामान असेच कायम राहिल्यास आंब्याचे (Mango Production)उत्पादन गेल्यावर्षीप्रमाणेच राहील, असा विश्वास सहा यांनी व्यक्त केला आहे.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत मिळून १० लाख हेक्टर क्षेत्रात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही राज्यांत मिळून उत्पादन ६० लाख टनांवर जाते. उत्पादन घटल्याने किरकोळ विक्रीचे दर वाढले आहेत. गेल्यावर्षी प्रति किलो १०० ते १२५ रुपयांचा दर होता. यंदा हाच आंबा प्रति किलो १५० ते १६५ रुपये दराने विकल्या जात आहे.
याउलट पश्चिम बंगालमध्ये संमिश्र चित्र पहायला मिळते आहे. उत्तर बंगालमध्ये चांगल्या पावसामुळे यंदा आंब्याचे उत्पादन वाढले आहे तर दक्षिण बंगालमधील आंबा उत्पादनात घट दिसून आली आहे. मात्र राज्यातील एकूण उत्पादन गेल्यावर्षीप्रमाणेच १० लाख टनांच्या जवळपास असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तेलंगणात ३ लाख हेक्टर क्षेत्रात १२.८ लाख टन आंब्याचे उत्पादन घेण्यात येते. यंदा तेलंगणातील आंबा उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी राज्यात आंब्याची दरवाढ झाली असल्याचे वारंगल येथील आंबा उत्पादक एस. रंगा रेड्डी यांनी सांगितले आहे. राज्यातील बहुतांशी आंबे इतर राज्यांत पाठवण्यात येतात, त्यामुळे स्थानिक बाजारात आंब्याची आवक कमीच असते, असेही रेड्डी यांनी नमूद केले आहे.
कर्नाटकातील आंब्याच्या (Mango) उत्पादनात यंदा ३० टक्क्यांची घट वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्याचे आंबा उत्पादन १३ ते १४ लाख टनांवर होते. यंदा ते केवळ ५ ते ६ लाख टनांवर आले असल्याची माहिती फलोत्पादनतज्ज्ञ एस. व्ही. हत्तलमणी यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशात यंदा आंब्याचे उत्पादन केवळ १५ लाख टन होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील आंबे जूनच्या प्रारंभी बाजारात दाखल होतात. त्यामुळे यंदा या आंब्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकल्या गेलेला आंबा यंदा ५० ते ६० रुपये प्रति किलोने विकला जाईल, असा अंदाज ऑल इंडिया मँगो ग्रोवर्स असोसिएशनचे (AIMGA) अध्यक्ष इन्साराम अली यांनी व्यक्त केला आहे.
क्रेडिट सोर्स : अग्रोवोन

