एकीकडे विजय मल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी बॅंकाचे हजारो कोटी बुडवून परदेशात पसार झाले आहे, तर दुसरीकडे एका शेतकऱ्याला केवळ ३१ पैसे थकबाकी असल्याने स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नो ड्युस ( कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला ) देण्यास नकार दिल्याची घटना गुजरातच्या अहमहाबाद येथे घडली आहे.
न्यायालयाने याबाबत एसबीआयला खडे बोल सुनावले आहेत. अहमदाबाद शहराजवळ संभाजी पाशाभाई यांची जमीन होती. ती त्यांनी राकेश व मनोज वर्मा यांना विकली. या जमिनीवर शेतीचे कर्ज होते. त्यामुळे ही जमीन वर्मा बंधूंच्या नावावर होत नव्हती. वर्मा बंधूनी ही थकबाकी भरण्याची तयारी दाखवली. पण याबाबत पुढे काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून वर्मा बंधू न्यायालयात गेले. न्यायालयात केस सुरु असतानाच एकीकडे कर्ज रक्कम भरली गेली. परंतू तरीदेखील बॅंकेने नो ड्यूस दाखला दिला नाही.
यावर न्यायालयाने बॅंकेला विचारणा केली असता बॅंकेकडून ३१ पैसे थकबाकी असल्याने दाखला देता येत नाही, असे उत्तर देण्यात आले. यावर न्यायमुर्ती भार्गव चांगलेच भडकले. ‘ ५० पैशापेक्षा कमी रक्कम असेल तर ती मोजली जात नाही, हा नियम तुम्हाला माहिती नाही का ? ‘ या शब्दात त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
न्यायालयाने आता बॅंकेकडून लेखी उत्तर मागवले असून या विषयावर २ मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
साभार : महान्युज

