सर्वसामान्य पणे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरवात होते आणि मार्च महिण्यापासून प्रखर उष्णता जाणवायला सुरुवात होते.
सामान्यपणे तापमान 45℃ किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास उष्मालहर आली आहे असे मानण्यात येते.
आपल्या देशात पूर्वी उष्मालहर येण्याचे प्रमाण कमी होते परंतु अलीकडच्या काळात औद्योगिकिकरण, प्रदूषण,वृक्षतोड, फ्रिज,एसी इत्यादी द्वारा उत्पन्न होणारे क्लोरोफ्लोरोकार्बन (CFC) गॅसेस मुळे ओझोनचा घटत चाललेला थर तसेच पर्यावरणातील झालेल्या बदलामुळे पूर्वी पडणारा वळवाचा पाऊस बंद झाल्यामुळे व एकंदरीतच बदललेल्या ऋतूचक्रामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे व आपल्या देशात वारंवार उष्मालहर निर्माण होत आहे.2008 ते 2018 या मागील दहा वर्षांच्या काळात आपल्या देशात साधारणतः 10,000 लोक उष्माघाता मुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.
पृथ्वी चे वाढते तापमान कमी करण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन,प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण पूरक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोताचा वापर,जल व्यवस्थापन इत्यादि उपाययोजना करता येऊ शकतात.
आता आपण वाढत्या तापमानाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम अर्थात उष्माघात याविषयी माहिती घेऊयात.
उन्हाळ्यात शरीराचे तापमान जर 102°F किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास उष्माघाताचे प्रथम लक्षण मानले जाते.
उष्माघाताची लक्षणे :- त्वचा कोरडी पडणे,खूप जास्त तहान लागणे,मळमळ होणे,उलटी होणे,थकवा येणे,ताप येणे, रक्तदाब वाढणे,मानसिक बेचैनी,अस्वस्थ वाटणे ही सर्व उष्माघाताची लक्षणे आहेत.
याशिवाय उष्माघाताची तीव्रता अधिक असल्यास चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था इत्यादि लक्षणे दिसून येतात व व्यक्ती कोमामध्ये जाण्याची अथवा दगावण्याची श्यक्यता असते.
उष्माघाताची कारणे:- उष्ण खोलीमध्ये अथवा तीव्र उन्हामध्ये शारीरिक श्रमाची कामे करणे, गच्च कपडे वापरणे,उष्णतेशी सतत सबंध येणे,उष्ण वातावरनात जसे कि काचेचे कारखाने, बॉयलर इत्यादी ठिकाणी श्रमाची कामे करणे,तीव्र उन्हाळ्यात पाणी कमी पिणे ही सर्व उष्माघात होण्याची कारणे आहेत.
तसेच अति मद्यप्राशन, अधिक प्रमाणात चहा व कॉफी सारखे पेय पिणे यामुळे देखील शरीरातील पाणी उत्सर्जित केले जाते.
तसेच मूत्र उत्सर्जन वाढविणारी औषधे ( Diuretics ) व अन्य काही औषधे जसे की एलर्जी साठी वापरण्यात येणारे औषधे ई मुळे देखिल अधिक प्रमाणात शरीरातील पाणी उत्सर्जित झाल्यामुळे उष्माघात होऊ शकतो.
मुख्यत्वे 0 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुले,65 वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्ती, श्रम करण्याची सवय नसलेल्या व्यक्ती ( अचानक पणे उन्हामध्ये श्रम केल्यास),धूम्रपान, मद्यपान, कॉफी पिणारे व्यक्ती,शेतात श्रम करणारे शेतकरी, कारखान्यात काम करणारे कामगार, उष्णतेच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती इत्यादि लोकांना उष्माघाताचा तडाखा बसू शकतो.
उष्माघात होऊ नये म्हणून
करावयाच्या उपाययोजना:- उष्माघात होऊ नये म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत श्यक्यतो सर्व महत्वाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी अर्थातच उन्हामध्ये फिरणे टाळावे.अत्यावश्यक कामासाठी उन्हाच्या वेळी बाहेर पडणे अपरिहार्य असल्यास डोके,चेहरा पूर्ण झाकल्या जाईल असा पांढरा रुमाल बांधावा.उन्हाळ्यात सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढऱ्या रंगाची वापरावीत,काळ्या रंगाचे किंवा गडद कपडे वापरू नयेत.उष्ण पेय जसे कॉफी, चहा,मद्यपान ई करणे टाळावे,सवय आहे म्हणून उन्हात जाणे टाळावे, अति व्यायाम करणे टाळावे,उन्हाच्या वेळी बंद गाडीमध्ये थांबणे टाळावे,गच्च कपडे घालणे टाळावे.
उष्माघात टाळण्यासाठी तहान नसेल तरीही भरपुर पाणी प्यावे दिवसभरातून साधारणतः 5 ते 6 लि. थंड पाणी प्यावे, थंड पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवावी, शरीरातील क्षारांची कमी भरून काढण्यासाठी लिंबूपाणी आणि मीठ घ्यावे.देशी थंडपेय जसे की लस्सी,कोकम शरबत, ऊसाचा रस,विविध फळांचे रस,नारळपाणी इत्यादी पेय उन्हाळ्यात उपयुक्त आहेत.
उन्हाळ्यात जास्त पाणी असलेली फळे उदा टरबूज, खरबूज इत्यादी खाणे उपयुक्त आहे.कामगार व शेतकरी वर्गातील कष्टकऱ्यानी सकाळी व सायंकाळी श्रमाची कामे करून दुपारी उन्हाच्या वेळी विश्रांती घ्यावी. दुचाकी चालवताना डोक्याला पांढरा रुमाल बांधवा,तसेच डोळयांना काळा चष्मा ( उन्हाळ्यात वापरण्याचा) वापरावा या सर्व उपाययोजना केल्यास उष्माघात टाळता येणे शक्य आहे.
उष्माघातावरील उपचार:- आधुनिक वैद्यकीय शास्त्रात उष्माघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवणे,सम्पूर्ण शरीर थंड पाण्याने पुसुन घेणे, रक्तदाब कमी झाला असल्यास सलाईन लावून रक्तदाब वाढविणे,रुग्णास ओआरएस द्रावण देणे या उपाययोजना करण्यात येतात. रुग्णाच्या डोक्यावर, काखेत कापडामध्ये गुंडाळून बर्फ ठेवणे इत्यादी उपचार केल्यास शरीराचे तापमान तात्काळ नियंत्रित होते.रुग्ण उन्हामुळे अत्यवस्थ झाला असल्यास रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीचे उपचार केले जाऊ शकतात…

