१९१६ मधला लखनौ काँग्रेस अधिवेशनातला प्रसंग. अधिवेशनासाठी आलेल्या नेत्यांचे तंबू मैदानात लागले होते. जमलेल्या नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी एक शेतकरी धडपडत होता. चंपारण्यातील शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या वेदना तो सांगत होता, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनात प्रस्ताव मांडण्याची विनंती करत होता; पण कुणी त्याचं मनोगत ऐकायला तयार नव्हतं. त्याची साधी दखलही कुणी घेत नव्हतं. अशातच काठेवाडी पोषाखातले गांधी त्याच्या नजरेस पडले. हा आपल्यातलाच माणूस दिसतोय, आपल्यासाठी हा काही तरी निश्चित करेल, या आशेने तो शेतकरी गांधींजवळ गेला. त्याने गांधींना नमस्कार केला. आपण चंपारण्यातील शेतकरी असून आपलं नाव राजकुमार शुक्ल आहे, असं त्याने गांधींना सांगितलं. ‘चंपारण्यातील शेतकऱ्यांवर निळीचे गोरे व्यापारी अन्याय करत आहेत. नीळ पिकवण्याचा त्यांचा तीन कठियाचा कायदा गरीब शेतकऱ्यांच्या गळ्यातला फास बनला आहे. यातून शेतकऱ्यांना वाचवा,’ हे राजकुमार शुक्लाचं निवेदन ऐकून गांधींचं हृदय हेलावलं. त्याबाबत काँग्रेस अधिवेशनात ठराव करण्याची विनंती त्याने गांधींना केली; परंतु, ‘प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्याशिवाय मी ठराव मांडत नाही,’ असं गांधींनी त्याला सांगितलं. त्यावर चंपारण्यात येण्याची विनंती राजकुमारने गांधींना केली आणि केव्हा येणार ते विचारलं.
‘येत्या काही दिवसांत फिरत फिरत पूर्वेला येईन. त्या वेळी तू मला भेट,’ असं गांधी त्याला म्हणाले. राजकुमार शुक्ल याचं म्हणणं खरं असेल तर तो आपल्याला पुन्हा भेटेल, हुडकले आणि त्याच्या म्हणण्यात काही तथ्य नसेल तर असं काही घडणार नाही, असा विचार करून गांधींनी त्यांचा निरोप घेतला.
या प्रसंगानंतर तीन-चार महिन्यांनी काँग्रेस बैठकीसाठी गांधी कलकत्त्याला गेले. तिथे राजकुमार शुक्ल गांधींसमोर पुन्हा हजर झाला आणि गांधींना ‘चंपारण्यात चला’ म्हणाला. त्यावर गांधींजी म्हणाले, “तुला मी शब्द दिला होता हे खरं, पण तिथली नेमकी समस्या काय आहे हे जर तू मला आत्ता सांगितलंस तर बरं होईल.” मग चंपारण्यातल्या अन्यायग्रस्त, गरीब शेतकऱ्यांची कैफियतच राजकुमारने गांधींना ऐकवली. तो म्हणाला- “आमच्या चंपारण्य जिल्ह्यात पिकवली जाणारी सगळी नीळ इंग्लंडला जाते. तिचे भाव गोरे व्यापारीच ठरवतात. पडेल भावात नीळ खरेदी करून वारेमाप नफा कमावतात. आम्हाला निळीचं पीक घेणं परवडत नाही. आमच्यावर अक्षरशः उपासमारीची पाळी आलेली आहे. पण व्यापारी जबरदस्तीने नीळ पिकवायला लावतात, जुलूम करतात. नीळ पिकवली नाही तर चाबकाने मारहाण करतात. ” चंपारण्यातल्या शेतकऱ्यांच्या वेदनेची कहाणी ऐकून सर्व कार्यक्रम बाजूला सारून गांधी राजकुमारबरोबर चंपारण्याला गेले.
त्या काळात जगातली ८० टक्के नीळ चंपारण्यात पिकत होती. कलकत्ता हे निळीचं मोठं व्यापारी केंद्र होतं. तिथून नीळ युरोप-अमेरिकेला निर्यात केली जायची. चोवीस तास चालणाऱ्या तिथल्या कारखान्यांना नीळ लागायची. शेतकऱ्यांनी नीळ पिकवली नाही तर कच्च्या मालाचा पुरवठा बंद होऊन कारखाने बंद पडण्याची शक्यता होती.. म्हणून, नुकसान झालं तरी चंपारण्यातील शेतकऱ्यांनी नीळ पिकवलीच पाहिजे, यासाठी जुलमी परंपरा लादण्यात आली होती. सरकारी यंत्रणेचा नीलवरांना (खरेदीदार दलाल) पाठिंबा होता. त्यांच्या या दडपशाहीखाली शेतकरी भरडून निघत होते. त्यांना कुणी वाली नव्हता.
या कायद्याची माहिती असलेले कुणी वकील तुझ्या माहितीत आहेत का, असं गांधींनी राजकुमार शुक्लांला विचारलं. त्याने पाटण्यातील राजेंद्रबाबूंचं नाव सांगितलं. गांधी शुक्लाबरोबर पाटण्यास आले, राजेंद्रबाबूंच्या घरी गेले व राजेंद्रबाबू बाहेर गेले असल्याचं त्यांच्या नोकराने सांगितलं. कोणत्या शूद्र जातीचे आहेत कुणास ठाऊक, असा विचार करून गांधी व शुक्लाला नोकराने बाहेर व्हरांड्यातच थांबायला सांगितलं. तशीच गरज पडली तर बाहेरच्या वेगळ्या शौचालयाचा वापर करण्याची सूचना देण्यासही तो विसरला नाही. यावरून पूर्वी जातिभेद किती दाहक होते हे लक्षात येतं. त्याची सीमा शौचालयापासूनच सुरू होत होती.
राजेंद्रबाबूंची वाट पाहून गांधी कंटाळले. लंडनला आपल्याबरोबर बॅरिस्टरी करीत असलेल्या पाटण्यातील मंजरुल हक्क यांची आठवण त्यांना झाली. नंतर एकदा मुंबईला दोघांची भेट झाली होती. त्यावर, कधी पाटण्यास आल्यास घरी येण्यार्थ निमंत्रणही मंजरुल हक्क यांनी गांधींना दिलं होतं. तो धागा पकडून गांधींनी शुक्लांबरोबर त्यांना चिठ्ठी पाठवली. ते घोडागाडी घेऊन आले आणि गांधींना आपल्या घरी घेऊन गेले. गांधींनी त्यांना नीळ उत्पादनासाठी जो तीन कठियाचा नियम आहे त्याबद्दल माहिती विचारली. त्यावर मुजफ्फरपुरातील वकीलच तुम्हाला त्याबाबत सांगतील, असं बॅ. हक यांनी सांगितलं. मुझफ्फरपुरातील प्रा. जिवतराम कृपालानी यांचे स्मरण गांधींना झाले. शांतिनिकेतनात ते गांधींना भेटले होते. रात्री साडेबारा वाजता रेल्वेने मुझफ्फरपूरला येत असल्याची तार गांधींनी कृपालानींना केली.
तार पाहून कृपालानींना खूप आनंद झाला. गांधी येणार म्हटल्यावर कॉलेजातल्या विद्यार्थ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करायचं ठरवलं, गांधींना कॉलेजच्या विश्रांतिगृहात उतरवण्याबाबत कृपालानींनी प्रिन्सिपॉलना विचारलं. पण प्रिन्सिपॉल होता एक गोरा इंग्रज. ‘दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या त्या बदनाम गांधीला कॉलेजात आणू नका. त्याची हॉटेलात सोय करा’, असं सांगत प्रिन्सिपॉलने थेट नकार दिला. त्यावर ‘अतिथीला आम्ही हॉटेलात ठेवत नाही.’ असं कृपालानी म्हणाले, मुझफ्फरपुरात गांधींना राहण्यायोग्य हॉटेल नव्हतं आणि कृपालानींचं स्वत:चं घरही नव्हतं मुझफ्फरपुरात. मग गांधींची राहण्या-जेवण्याची सोय मित्राच्या घरी करायचं ठरवून कृपालानी स्वतः स्वागताच्या तयारीला लागले. विद्यार्थ्यांनी स्वागताचं सामान गोळा केलं. हार-तुरे आणले. तयारी करता करता रात्रीचे अकरा वाजून गेले. गांधींना देण्यासाठी नारळ आणायचा राहून गेल्याचं विद्यार्थ्यांनी कृपालानींना सांगितलं. पण दुकानं बंद झाली होती. शहरात सामसूम झाली होती. शेवटी एका बंद घरासमोरच्या नारळाच्या झाडावर चढून कृपालानींनी स्वतः नारळ काढला. एक घोडागाडी ठरवून ते स्टेशनवर पोहोचले. रेल्वे नुकतीच स्टेशनात येऊन थांबली होती. विद्यार्थी फर्स्टक्लासच्या डब्याकडे धावले; पण फर्स्टक्लासच्या डब्यातून कुणी गांधी उतरताना त्यांना दिसले नाहीत. तेवढ्यात थर्डक्लासच्या डब्याकडे कृपालानी निघाले आहेत, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. एव्हाना डब्यातून गांधी खाली उतरले होते. ‘ते पाहा गांधी’ असं म्हणत मग विद्यार्थीही थर्डक्लासच्या डब्याकडे धावले. गांधींचं शानदार स्वागत झालं. स्टेशनच्या बाहेर घोडागाडी तयार होती. ‘त्यात बसावं’ अशी गांधींना विनंती करण्यात आली. ‘तुम्ही घोडागाडीत बसा, आम्ही गाडी ओढतो’, असं विद्यार्थी त्यांना म्हणाले; पण गांधींनी पायी चालणं पसंत केलं. सर्वांसोबत पायी चालत गांधी कृपालानींच्या मित्राच्या निवासस्थानी आले. सकाळी कृपालानींनी मुझफ्फरपुरातील काही वकिलांची गांधींबरोबर चर्चा घडवून आणली. त्यांनी चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या समस्या गांधींना समजावून सांगितल्या. नीळ जमिनीचा ‘तीन कठिया’ कायदा सांगितला. वीस कठांचा एक एकर. त्या काळात एकरापैकी तीन कठांत निळीची लागवड करणं इथल्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलं होतं. हीच तीन कठिया पद्धत. निळीच्या इंग्रज खरेदीदारांना नीलवर म्हणत. हे नीलवर मागतील त्या भावात शेतकऱ्यांना निळीचं पीक विकावं लागे. निळीचं पीक घेतलं नाही तर नीलवर शेतकऱ्यांचा अमानुष छळ करत. तीन कठिया पद्धतीचा भंग करणाऱ्या शेतकऱ्यास तुरुंगात डांबत, चाबकाने फोडून काढत. सव्वाशे वर्षांपासून होत असलेल्या या अन्याय-अत्याचाराविरुद्ध शेतकऱ्यांनी तीन वेळा हिंसक आंदोलन केलं होतं; पण नीलवरांनी ते दडपून टाकलं होतं. त्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. चंपारण्यातल्या पराकोटीला पोहोचलेल्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, तिथे आंदोलन छेडण्यासाठी ठाम निर्धाराने २ एप्रिल १९१७ला गांधींनी चंपारण्य जिल्ह्यात प्रवेश केला.
गांधी हा एक अजब माणूस होता. कोणतंही आंदोलन सुरू करण्यापूर्वी ज्यांच्याविरुद्ध आंदोलन करायचं आहे त्यांना भेटून त्यांचे विचार ऐकून घेण्याची गांधींची होती. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आंदोलन सुरू करण्यापूर्वी गांधी जनरल स्मट्स यांना भेटले होते. ‘तुमच्याविरुद्ध मी लढा पुकारणार ‘असल्याचं’ सांगून ‘तुमच्या मदतीतूनच मी लढा जिंकेन,’ असंही गांधींनी जनरल स्मट्स यांना सांगितलं होतं. त्याच धर्तीवर ज्यांच्याविरूद्ध चंपारण्यातल्या शेतकऱ्यांची तक्रार आहे त्या नीलबरांना भेटण्याचं गांधींनी ठरवलं. दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनांचा अनुभव गांधींच्या पाठीशी होता. कोणत्याही कठीण प्रसंगाला निर्भयपणे सामोरं जाण्याचं मनोबल त्यांच्यापाशी होतं. त्या जोरावर नीलवरांना भेटण्यासाठी गांधी त्यांच्या संघात गेले.
हिमालयाच्या तराई प्रदेशाच्या तिरहुत विभागात सहा जिल्हे होते. त्यातला चंपारण्य हा एक जिल्हा. चंपारण्याचं जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे मोतीहारी मोतीहारीत जाण्यापूर्वी गांधी नीलवरांच्या संघटनेच्या सेक्रेटरींना मुझफ्फरपुरात भेटले. नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येबाबत गांधींनी त्यांच्याशी चर्चा केली, आणि नंतर ‘या भागात तुम्ही परदेशी आहात. यात तुम्ही पडू नका. ते तुमचं काम नाही. यातलं तुम्हाला काही समजणार नाही,’ असा मानभावी सल्ला नीलवरांनी गांधींना दिला. युरोपातून आलेले हे गोरे नीलवर ‘देशी’ आणि याच भूमीत जन्मलेले गांधी मात्र ‘परदेशी’, ही नीलवरांची अक्षरशः अनाकलनीय होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या समस्येची चौकशी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, असं गांधींनी नीलवरांना ठणकावून सांगितलं. नंतर ते कलेक्टर व पोलिस कमिशनरांना भेटले. ‘स्थानिक लोक व नीलवरांच्या भानगडीत लक्ष घालू नका. त्यांना त्यांची समस्या सोडवू द्या,’ असा सल्ला गांधींना कलेक्टर-पो. कमिशनरांकडूनही मिळाला. नीलवर, कलेक्टर आणि पो. कमिशनरांत काही तरी साटंलोटं असल्याची जाणीव गांधींना झाली. त्यांचा सत्याग्रह सुरू झाला.
मोतीहारी परिसरातल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या चौकशीसाठी गांधी निघाले. बरोबर जीवतराम कृपालानी, धरणीधरबाबू आणि राजकुमार शुक्ल, शेख गुलाब, शीतल रॉय, प्रजापती मिश्र अशी मंडळी होती. रस्त्याची दुरवस्था आणि अरण्यक्षेत्र यामुळे गांधींचा प्रवास हत्तीवरून सुरू झाला. मोतीहारीपासून काही अंतरावर असताना सायकलवरून आलेल्या एका सरकारी माणसाने त्यांना गाठलं. पोलिस कमिशनरसाहेबांचा सलाम सांगून त्यांनी भेटायला बोलावलं असल्याचा निरोप त्याने गांधींना सांगितला. गांधी काय समजायचं ते समजले. साथीदारांना पुढे जायला सांगून ते पोलिस कमिशनरांना भेटले. ‘पुढे खेड्यात जाऊन चळवळीला खतपाणी घालू नका’ असं गांधींना पोलिस कमिशनरांनी बजावलं. चंपारण्यातल्या खेड्यात न जाता परत माघारी जाण्याचा सल्ला त्यांनी गांधींना दिला. त्यावर आपण शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी व तक्रारी ऐकण्यासाठी जात असल्याचं गांधींनी त्यांना सांगितलं. मग चंपारण्य जिल्ह्यात प्रवेशबंदी असल्याचा लेखी आदेशच पोलिस कमिशनरांनी गांधींच्या हातात दिला आणि ‘हा आदेश तुम्हाला पाळावाच लागेल,’ असं दरडावलं. गांधी त्यावर शांतपणे म्हणाले, “या देशातला कुणी माणूस जर अन्यायाविरुद्ध तक्रार करत असेल, तर ती सत्य आहे की असत्य ते पाहण्यासाठी जाणं हे या देशाचा नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. कृपया तुम्ही मला अडवू नका.” मोठ्या निर्धाराने असं निक्षून सांगणारा पहिला माणूस इथल्या पोलिस कमिशनरांना भेटला तो असा… गांधींच्या रूपात!
दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचं समन्स गांधींवर बजावण्यात आलं. त्यानुसार गांधी न्यायालयात हजर झाले. शेतकरी आणि साथीदारांच्या गर्दीने न्यायालय भरून गेलं होतं. प्रवेशबंदीचा सरकारी आदेश न पाळण्याचा गुन्हा केल्याचं व त्यासाठी गांधींना शिक्षा करण्याचं प्रतिपादन सरकारी वकिलाने केलं. त्यावर गांधींनी दोन शब्द बोलण्याची परवानगी न्यायाधीशांकडे मागितली. न्यायाधीशांनी परवानगी देताच गांधी म्हणाले, “न्यायाधीश महाराज, मी कायदा पाळणारा माणूस आहे; परंतु इथला प्रवेशबंदीचा कायदा मी पाळणार नाही, हे आपणास मी विनयपूर्वक सांगतो. गरीब शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकणं मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून सरकारी आदेशाचा मी भंग केला, कायदेभंग केला, हे मी सविनय कबूल करतो. या खटल्यात आपण आपला बहुमूल्य वेळ वाया न घालवता पुढील कारवाई करावी. मला आत्ताच शिक्षा सुनवावी.” गुन्हा कबूल करून लगेच शिक्षा मागणारा गांधींसारखा अजब आरोपी न्यायाधीशांनी तोवर पाहिला नव्हता. पण लगेच शिक्षा सुनावण्याचा पुन्हा पुन्हा आग्रह धरूनही न्यायाधीशांनी ते मानलं नाही. शिक्षेचा निर्णय न्यायाधीशांनी दुसऱ्या दिवसावर ढकलला. गांधींना विचार करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी एक रात्र मिळाली. तेवढ्या वेळात गांधींनी गव्हर्नराला तार केली. ‘आपण चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या चौकशीसाठी जात होतो. प्रवेशबंदीच्या गुन्ह्याखाली मला मोतीहारीत निष्कारण अडकवून ठेवण्यात आलं आहे. आपण न्याय करावा,’ असा मजकूर गांधींनी तारेत लिहिला. व्हॉइसरॉय यांनाही याबाबत कल्पना द्यावी, असंही तारेत गांधींनी लिहिलं होतं. तारेचा चांगला परिणाम झाला. गांधींना प्रवेशबंदी न करता सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा व्हाइसरॉयचा कमिशनरला आदेश आला. अर्थातच प्रवेशबंदी आदेशभंगाचा गांधींविरुद्धचा खटला मागे घेण्यात आला. शेतकऱ्यांनी जल्लोष केला. ‘गांधीका बबुआ ‘जिओ’ अशा घोषणा दिल्या.
दुसरीकडे, गांधींच्या चंपारण्यातील प्रवेश व खटल्याबाबत उलटसुलट बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या होत्या. काही वृत्तपत्रं ब्रिटिशधार्जिणी होती. नीलवरांनी त्यांना हाताशी धरून गांधी व त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी केली होती. अशा बातम्यांनी आपल्या सत्याग्रहात कुठेही अडसर निर्माण होऊ नये, सत्याग्रहाला पोषक अशा सत्य वार्ताच वृत्तपत्रांत प्रसिद्ध व्हाव्यात यासाठी काही करणं गांधींना तातडीचं आणि महत्त्वाचं वाटत होतं. ‘प्रसिद्धीयोग्य बातम्या मी स्वतः तुमच्याकडे पाठवेन. तुम्ही तुमच्या बातमीदारांना इकडे पाठवण्याचा त्रास घेऊ नका,’ या आशयाचं पत्र गांधींनी विविध वृत्तपत्रांच्या संपादकांना पाठवलं. दुसरी गोष्ट गांधींनी केली, ती म्हणजे चंपारण्यातल्या सत्याग्रहापासून राजकीय नेत्यांना गांधींनी दूर ठेवलं. सत्याग्रहाला राजकीय रंग चढू न देण्याचा उद्देश त्यामागे होता. भारतातल्या सुरुवातीच्या दिवसांतही अशी विविधांगी व्यूहरचना एखाद्या कसदार राजकीय नेत्यालाही लाजवेल इतक्या सफाईदारपणे गांधींनी केली होती. गांधी हा अनेक अर्थांनी नव्या रंगाचा व ढंगाचा माणूस होता, असं राहून राहून वाटतं ते यामुळेच.
चंपारण्यातला प्रश्न सोडवण्यासाठी गांधी अक्षरशः झपाटले होते. तिथल्या खेड्यापाड्यांत फिरून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायला आणि त्यांच्या तक्रारी नोंदवायला गांधींनी सुरुवात केली. चार-पाच प्रांतांतून अनेक वकील गांधींना मदत करण्यासाठी आले. त्यात व्रजकिशोरबाबू (जयप्रकाश नारायण यांचे सासरे), धरणीधरबाबू, शंभूबाबू, गयाबाबू, अनुग्रहबाबू असे अनेकजण होते. जीवतराम कृपालानी म्हणजेच आचार्य कृपालानी तर प्रथमपासून गांधींबरोबर होते. आपल्या आश्रमातून गांधींनी महादेवभाई देसाई व नरहरीभाई परीख या वकिलांनाही बोलावून घेतलं होतं. विशेष म्हणजे पाटण्यातील ज्या वकिलाच्या नोकराने गांधींना शूद्राची वागवूक दिली ते वकीलही गांधींच्या मदतीसाठी तेव्हा धावून आले होते. #राजेंद्र_प्रसाद हे त्या वकिलाचं नाव. स्वातंत्र्य मिळाल्यावर हेच वकीलबाबू भारताचे पहिले राष्ट्रपती झाले.
राजेंद्रबाबूंनी चंपारण्यातल्या सत्याग्रहाच्या निमित्ताने बापूंच्या ज्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत त्या इथे नोंदवण्याजोग्या आहेत. चंपारण्यातील प्रश्नासंदर्भाने बापूंना मदत करण्यासाठी बिहारमधून आलेल्या काही वकिलांनी स्वतःसोबत आपापल्या जातीचे स्वयंपाकी आणले होते. ही मंडळी दुसऱ्या जातीच्या हातचं अन्न खात नसत. ज्या वेळी गांधींच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांना ते पटलं नाही. वेगवेगळ्या चुली मांडण्यापेक्षा सर्वांचा स्वयंपाक एकत्रितपणे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सर्वांनी त्यांचा निर्णय मानला. एकत्रित स्वयंपाक व जेवण होऊ लागलं. त्या अनुषंगाने राजेंद्र प्रसादांनी लिहिलं आहे- ‘पत्नी अथवा ब्राह्मण सोडून चंपारण्यात पहिल्यांदाच मी दुसऱ्या जातीच्या माणसाच्या हातचं अन्न खाल्लं. जातिप्रथेवर गांधींनी जो प्रहार केला त्यातून आम्ही खूप काही शिकलो. काही न बोलता त्यांच्या जातिनिर्मूलनाच्या कामात सहभागी झालो.’ दुसरा एक अनुभव सांगताना राजेंद्रबाबू लिहितात- ‘आम्ही सारे गांधींसोबत एकाच धर्मशाळेत राहिलो होतो. बापूंच्या खोलीशेजारीच माझी खोली होती. एके रात्री बापूंच्या खोलीतून धपऽऽ धपऽऽ असा आवाज येऊ लागला. मला वाटलं, कुणी तरी खोलीची भिंतच फोडतंय. मी उठून बापूंच्या खोलीत गेलो. पाहिलं, तर बापू स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे धुवत होते. यावरून बोध घेत दुसऱ्या दिवसापासून मीही स्वतःचे कपडे स्वतःच धुवायला लागलो. स्वावलंबनाचा पहिला धडा मला बापूंकडून मिळाला.’
असो. चंपारण्यातल्या सत्याग्रहाचे दिवस जसे सरत होते तसा तक्रारी नोंदवण्याच्या प्रक्रियेला वेग येत होता. हजारो शेतकरी आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे आले होते. ‘खोट्या तक्रारी कुणी सांगू नयेत. प्रत्येक तक्रारीची चौकशी होणार आहे. अर्थातच सत्य असेल तेवढंच सांगावं,’ अशी विनंती गांधींनी सर्व शेतकऱ्यांना केली होती. नीलवरांकडून होणाऱ्या अन्याय व शोषणाच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी नोंदवल्या होत्या, आपले जबाब लिहून दिले होते. रात्रंदिवस अखंडपणे तक्रारी नोंदवण्याचं काम चालू होतं. जेव्हा सुमारे ४ हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या, तेव्हा बिहारच्या गव्हर्नरांनी या विषयावर चौकशीसाठी एक चौकशी समिती नियुक्त केली. समितीचं काम चालू होतं तेव्हाही तक्रारी नोंदवल्या जातच होत्या. समितीचं काम तीन-चार महिने चाललं, तोपर्यंत तक्रारींची संख्या २५ हजार झाली. आपल्या स्वार्थाआड येणाऱ्या गांधींना धडा शिकवण्याची चर्चा नीलवरांत चालू झाली. ‘गांधी डरपोक आहे. जिथे जातो तिथे अनेक माणसांच्या सोबतीने फिरतो. एकटा भेटला तर मी त्याला गोळी घालीन,’ अशी दर्पोक्तीही एका नीलवराने केली होती. ही गोष्ट गांधींच्या कानावर गेली.
रात्रीची वेळ होती. गांधी व महादेवभाई देसाई धर्मशाळेतल्या एकाच खोलीत झोपले होते. खूप थंडी होती. पण गांधी भल्या पहाटेच उठले. महादेवभाईंनाही जाग आली. त्यांनी घड्याळात पाहिलं, तर तीन वाजले होते. गांधी नेहमी पहाटे चारला उठतात, पण आज तीनलाच कसे उठले, असा प्रश्न महादेवभाईंना पडला. पण महादेवभाई तसेच बिछान्यावर पडून राहिले. थोड्या वेळाने दात घासून, चपला घालून #गांधीजी बाहेर पडले. मग मात्र महादेवभाईंना राहवलं नाही. तेही लपतछपत गांधींमागे निघाले. गावाची सीमा पार करून गांधी दुसऱ्या गावात प्रवेशले आणि एका घराच्या बंद दरवाज्यासमोर उभे राहिले. त्यांनी दार ठोठावलं. ते एका नीलवराचं घर होतं. साखरझोपेत व्यत्यय आणला म्हणून संतापाच्या भरात त्याने दार उघडलं, बापू शांतपणे त्याला म्हणाले, “गांधी एकटे भेटले तर त्यांना गोळी घालण्याची आपण प्रतिज्ञा केल्याचं माझ्या कानावर आलं आहे. मी तरी काय करणार? इच्छा असूनही मला एकान्त मिळत नाही. लोक मला सोडत नाहीत. आपल्याला एकटं भेटण्याची इच्छा होती, त्यासाठी इतक्या पहाटे आलो. आपण आपलं काम करून टाका. प्रतिज्ञा पुरी करा.” १९१७ सालातली ही घटना आहे. या घटनेपासून १९४७च्या राजकीय स्वातंत्र्यापर्यंतचा गांधींचा सर्व व्यवहार असा निर्भय होता. हीच निर्भयता त्यांची शक्ती बनली आणि याच निर्भयतेने साऱ्या आंदोलनांना बळ दिलं.
चंपारण्यातील निळीच्या सत्याग्रहाबाबतही असंच घडलं. नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे अर्ज व गांधींच्या मागणीबाबत चौकशी करण्यासाठी गव्हर्नरांनी एक समिती स्थापन केली. नीलवरांचे दोन प्रतिनिधी, दोन सरकारी प्रतिनिधी, तत्कालीन असेंब्लीचे दोन सदस्य व शेतकऱ्यांची बाजू घेणारे एकमेव #गांधी अशा सातजणांचा समितीत समावेश करण्यात आला. तीन कठिया पद्धत बंद करून निळीचं पीक घेण्याची शेतकऱ्यांवरील जबरदस्ती रद्द करावी व आपल्या शेतात कोणतं पीक घ्यायचं या बाबतीतलं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळावं, अशी आग्रही मागणी गांधींनी बैठकीत मांडली. आपल्या गैरकृत्यांची चौकशी झाली तर त्रास होईल, या भीतीमुळे गांधींच्या मागणीला नीलवरांनी पाठिंबा दिला. गांधींच्या मागण्या एकमताने मान्य झाल्या. सव्वाशे वर्षांपासून चालू असलेली तीन कठिया पद्धत बंद झाली. #चंपारण्यातील_सत्याग्रहाचा विजय झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्यानंतर गांधी देशभरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईतच बनून गेले.
अन्यायी नीलवरांना शिक्षा व्हावी यात गांधींना रस नव्हता. व्यवस्था बदलावी, हीच त्यांची मागणी होती. विरोध व्यक्तीला नाही तर व्यवस्थेला आहे, हा विचार मॉरिसबर्ग स्टेशनवरील प्रसंगातून त्यांच्या मनात रुजला होता. त्याच विचाराशी एकनिष्ठ राहून त्यांनी निळीचा सत्याग्रह यशस्वी केला.
सत्याग्रहातून बाजूंना सहकार्य करण्यासाठी गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशातून अनेक वकील मंडळी चंपारण्यात आली होती. आंदोलनाबरोबर चंपारण्यात गांधींनी आरोग्य, सफाई, शिक्षण इत्यादी रचनात्मक कार्य केलं. त्यासाठी मुंबईहून अवंतिकाबाई गोखले, पुण्याचे डॉ. देव, कर्नाटकमधून पुंडलिक कातगडे, तसंच बिहार, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इत्यादी प्रांतातल्या कार्यकर्त्यांनी चंपारण्यात गांधींच्या नेतृत्वाखाली काम केलं. साने गुरुजींच्या आंतरभारतीचा पाया गांधींनी चंपारण्यात घातला. चंपारण्य सत्याग्रहापासूनच अखिल भारती सेवकत्वाचा आरंभ झाला.
अज्ञात_गांधी
महात्मा_गांधी
🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳