“वाघ्या घेवड्याला जीआय मानांकन मिळाले खरे पण बाजारातील प्रश्न काही सुटले नाहीत. चीन, पोलंड, युगांडा आदी देशातून दिल्लीसह उत्तर भारतात राजम्याची मोठ्याप्रमाणात आयात झालीय. म्हणून कोरेगाव, खटाव, वडूज आदी विभागात भाव पडलेत. वडूजसारखे बाजार तर बंद ठेवलेत. कारण मागणी नाही, आणि वाढत्या आयातीमुळे बाजाराची दिशा स्पष्ट नाही. शेतकऱ्यांनी माल कुठे विकावा, …ऐन सणासुदीत वाघ्या घेवडा उत्पादकांची परवड सुरू आहे…” अनिल पवार सांगत होते.
उंबरडे, वडूजचे अनिल पवार हे शेतकरी आहेत, शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत.
“सात आठ हजार क्विंटलपर्यंत भाव घटलेत. अकरा-बारा हजारावरून भाव घटलते. अशा स्थितीत कोल्ड स्टोरेज मात्र फूल होताहेत. कोट्यावधी रुपयांचे स्टॉक लागताहेत. …इकडे सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबवणे अपेक्षित होते. पण, खुद्द बाजार समितीलाच योजनेबद्दल नीट माहिती नाही. सध्याच्या बाजारभावात शेतकऱ्यांकडून माल घेवून 80 टक्के पेमेंट करता आले असते. एकरी सात – आठ क्विंटल पिकणाऱ्या मालामध्ये किमान तीस-चाळीस हजार मिळून शेतकऱ्यांची दसरा – दिवाळी तरी साजरी झाली असती, पण… कुणीही याबाबत गंभीर नाही.”
सत्ताधारी तर काहीच करत नाही, पण विरोध पक्ष सुद्धा याबाबत गंभीर नाही, असे अनिल पवार यांचे म्हणणे आहे.
एवढी स्वस्त आयात का होते, स्थानिक लोकप्रतिनिधी आयात रोखण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा का करत नाहीत, ऐन हंगामात पॅनिक सेलिंग होते, तेव्हा साठा व्यवस्थापनासंदर्भात पावले का उचलले जात नाही, असे अनेक नेहमीचे अनुत्तरित राहणारे प्रश्न, वाघ्या घेवड्याच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
- साभार : दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक ता. 4 ऑक्टोबर 2022.