महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. मराठवाडा व विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे येथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते.कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. कापसाचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. सरकी आणि रुईसाठी गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजाती वापरल्या जातात. याच्या यशस्वी उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे गुलाबी बोंड अळी.
गुलाबी बोंड अळीचे शास्त्रीय नाव हे पेक्टिनोफोरा गॉसिपिएला असुन ती कपाशीवरील जगातील सर्वात महत्त्वाची किडी आहे. महाराष्ट्रातील कापसावर या अळीच्या प्रादुर्भावाचा अहवाल ईटीएलच्या वर नोंदवला गेला आहे आणि २०१७-१८ मध्ये ३३ % पीक नुकसान या अळीने केले आहे. ही अळी भेंडी व अंबाडी, जास्वंद, ताग या पिकांवर खाते गुलाबी बोंड अळीला शेंदरी बोंड अळी या नावानं ओळखल जाते.
जीवनक्रम : गुलाबी बोंडअळीच्या जीवनाच्या अंडी, अळी, कोष, प्रौढ या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था खूप नुकसानकारक असते. प्रौढ मादी पतंग कपाशीच्या फांदया, कळ्या आणि फुलांवर एकट्याने किंवा गटाने साधारणपणे २००-४०० अंडी घालते. अंड्यातून ४-६ दिवसांत अळ्या बाहेर पडतात. अळीच्या पहिल्या व दुसऱ्या अवस्थेत अळीचा रंग पांढरा असतो. तिसऱ्या अवस्थेत रंग गुलाबी किंवा शेंदरी दिसतो. अळी अवस्था कालावधी १८- २१ दिवसापर्यंत असू शकते. नंतर अळी जमिनीत सुमारे ५० मिमी खाली कोष अवस्थेत जाते आणि प्रौढ सुमारे ८- १० दिवसात बाहेर पडतात. अश्याप्रकारे जीवनचक्र २५ ते ३१ दिवसांत पूर्ण होईल.
जेंव्हा वातावरण बदलते तेंव्हा अळ्या सुप्त अवस्थेमध्ये देखिल जाऊ शकतात जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा सुप्त अवस्थतेमधील अळ्या बाहेर येतात.
नुकसानीचा प्रकार:
गुलाबी बोंड अळीची
अळी अवस्था सर्वात नुकसानकारक आहे मादी पतंग कळ्या, फुले यांवर अंडी घालते यानंतर त्या अंड्यातून पाच ते सहा दिवसांत अळ्या बाहेर पडतात अन् त्या फुले, कळ्या आणि बोंडांमध्ये प्रवेश करतात आणि आतील भाग खातात.अळी प्रादुर्भावग्रस्त फुले गुलाबाच्या फुलांसारखे किंवा (डोम कळी) सारखे दिसतात नंतर प्रादुर्भावग्रस्त फुले,कळ्या व लहान बोंडे गळून पडतात. अळी बोंडांमध्ये प्रवेश करून त्यातील धागा व बिया खाते एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते. तिच्या विष्टेमुळे धाग्याची प्रत खालावते.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१) उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करावी यामुळे कोष अवस्थेतील किडी सूर्यप्रकाशामुळे किंवा किटकभक्षी पक्षांमुळे नष्ट होतात.
२) कपाशीची लागवड योग्य वेळी योग्य अंतरावर करावी .
३)एप्रिल-मे महिन्यात कापसाच्या पिकाची पेरणी करू नका कारण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल.
४) जून महिन्यात कपाशीची लागवड करा ज्यामध्ये लवकर कमी कालावधीमधे येणाऱ्या बीटी कॉटन वाणांची लागवड करा.
५) कपाशीच्या लागवडीच्या वेळी मका किंवा ज्वारी चे बियाणे मिसळून टाकावे म्हणजे ते पक्षी थांबे म्हणून काम करते.
६) गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी पीक फेरपालट करावे.
७)आंतर मशागत करुन उदा. कोळशी,रानभेंडी,पेटारी हि तण वेळोवेळी काढून टाकावी.
८) पेरणीनंतर ४५ दिवसांनी गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या क्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी गॉसील्यूर कामगंध सापळे @५ /हेक्टर लावा.
९)शेतात मधील गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंडे गोळा करून नष्ट करा.
१०)जर शेतात कपाशीचे फुले डोम कळी सारखे किंवा गुलाबाच्या फुलासारखी दिसली, तर ती तोडून टाका त्यामुळें गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत
होते.
११)गुलाबी बोंडअळीची मास ट्राप्पिंग
(मोठ्यप्रमाणावर पतंग नष्ट करण्यासाठी) मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे.
१२)लागवडीनंतर ६०-६५ दिवसांनी निंबोळी अर्क (NSKE) ५% ची एक फवारणी घ्यावी त्यामुळे ते आहार विरोधी व अंडीनाशक म्हणून काम करते.
१३)परजीवी ट्रायकोग्रामाटॉइडी बॅक्ट्रीची अंडी @ ३ सी सी (६००००)/एकरी सोडावे.
१४) (आर्थिक नुकसानीची पातळी प्रती कामगंध सापळ्यात दोन ते तीन दिवस सातत्याने प्रती सापळा ५ ते ६ पतंग) सापडले खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने करावी व पॉवर पंपाने करावयाची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.
#क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३०% अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६०% @ ५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात किंवा # इमामेक्टिन बेनझोएट ०.५% एस.जी प्रति @ ४.४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात किंवा # क्लोरपायरीफॉस २०% इ. सी @ २० मिली प्रति १० लिटर पाण्यात किंवा फेनेव्हेलरेट २०% ई. सी @ १० मिली प्रति १०लिटर पाण्यात किंवा किंवा सायपरमेथ्रिन १०% इ.सी @१० मिली प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(सर्व कीटकनाशक हे लेबल क्लेम नुसार आहेत)
प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे ( कीटकशास्त्रज्ञ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विधाका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड)