खळद (ता. पुरंदर) येथे खळद फाटा नजीक असणाऱ्या पाटील वस्ती येथील शेतकरी साहेबराव विठ्ठल कामथे यांच्या गोठ्यातील वासरावर तरसाने हल्ला केल्याने वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे कामथे गोठ्याकडे गेले असता त्यांना छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये वासराच्या मृत्यू झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी वासराच्या मानेला चावा घेतला होता, तर दोन पायातील मध्यभाग खाल्ला होता. आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यावर वन्यप्राण्याने हा हल्ला केल्या असल्याचे त्यांना जाणवले. बाजूला असणाऱ्या पायाच्या ठशांवरून हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला.
माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पायाच्या ठशांवरून सदर हल्ला हा तरसाने केला असल्याचे सांगितले. यावेळी जेजुरीचे वनपाल राहुल रासकर, सुरक्षारक्षक सोमनाथ खटाटे, सहायक अक्षय जाधव, किरण होले, सासवडचे वनपाल शीतल बागल यांनी सहकार्य केले. वनपाल राहुल रासकर यांनी सांगितले की, शिवरी गावच्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमध्ये बिबट्याचा वावर आहे. येथे बिबट्याच्या हल्याच्या घटनाही घडल्या आहेत, मात्र खळदमध्ये यापूर्वी अशी कोणतीही घटना घडली नाही अथवा बिबट्याचे वास्तव्य असल्याचे कोणाच्याही निदर्शनास आले नाही, तरी सदर हल्ला हा बिबट्याने केला नसून, तरसाने केला आहे. तरीही शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता रात्रीच्या वेळी फिरताना एकत्रित फिरावे. जनावरांचे गोठे बंदिस्त करावेत जेणेकरून अशा हल्ल्यांपासून जनावरे सुरक्षित राहतील.