हल्ली लग्नसमारंभ, मोठ्या सभांसाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. पण ड्रोनचा वापर एवढाच मर्यादीत नाही. ड्रोनचा वापर शेतात केल्यास लाखोच्या संख्येने रोजगार निर्मिती तर होईलच. पण खर्च वाचून शेतीत अमुलाग्र बदल होतील असा दावा करण्यात येत आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एका अहवालात याविषयीचा दावा करण्यात आला आहे.
मंगळवारी फोरमने याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, ड्रोनचा शेतात वापर वाढवल्यास त्याचा फायदा दिसून येईल. केंद्र सरकारने शेतात ड्रोन वापरास प्रोत्साहन दिल्यास देशाचे सकल उत्पन्नात (GDP) वाढ होऊ शकते. देशाचा जीडीपी(GDP) एक ते दीड टक्क्यांनी वाढू शकतो.
एवढेच नाही तर फोरमच्या दाव्यानुसार, या माध्यमातून स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मितीही होऊ शकते. ड्रोनचा वापर वाढल्यास यासंबंधीच्या तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. देशात तब्बल 5 लाख लोकांच्या हाताला काम मिळू शकते.
WEF च्या अहवालानुसार, भारतीय कृषीसाठी ड्रोनचा वापर केल्यास कृषी क्षेत्रात पुन्हा एक क्रांती येऊ शकते. WEF ने अदाणी समुहाच्या मदतीने हा अहवाल तयार केला आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदलासह रोजगार निर्मितीची बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
या अहवालात विविध संशोधनाचा आधार घेत भारतातील शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल होण्याचा दावा करण्यात आला आहे. तांत्रिक आणि आधुनिक यंत्राचा वापर करुन शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते असा दावा करण्यात येत आहे.
अहवालानुसार, ड्रोन आणि तंत्रज्ञानाचा कुशल वापर केल्यास शेती क्षेत्रात 15 टक्के उत्पादन वाढू शकते. कृषी उत्पादन 600 अरब डॉलर होऊ शकते. हे लक्ष्य साध्य करण्यात ड्रोनचा मोठी मदत होईल.
केंद्र सरकारने वेळीच या क्षेत्रात लक्ष्य घातल्यास ड्रोन आणि तत्सम उद्योगात 50 अरब डॉलर पर्यंत गुंतवणूक वाढू शकते असा दावा अहवालात करण्यात आला आहे. यामाध्यमातून भारतात येत्या काही दिवसात पाच लाख तरुणांना रोजागार मिळू शकतो