ऊस उत्पादक शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर केलेले वजन साखर कारखान्यांना नाकारता येणार नसल्याचा निर्वाळा वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे. त्यामुळे काटामारी करुन ऊसच्या मापात पाप करणार्या कारखान्यांना आता चाप बसण्याची अपेक्षा असून बुधवारी साखर आयुक्तालय या बाबतचे परिपत्रक जारी करणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी साखर संकुलवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी स्वाभिमानीने उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाकडे आणि वैध मापन विभागाकडे पाठपुरावा यशस्वी झाला आहे. त्यादृष्टिने वैध मापन विभागाकडून आलेले स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण ठरले असून एक प्रकारे स्वाभिमानीची मागणी मान्य झाली आहे.
शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर वजन करुन नेलेला ऊस स्वीकारण्यास साखर कारखाने नकार देतात. तशा तक्रारी वैध मापन शास्त्र विभागाकडे करण्यात आल्याची दखल घेण्यात आली आहे. ‘खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखान्यांकडून नाकारणे ही अनुचित प्रथा ठरेल,’ असे स्पष्ट पत्र वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्तालयाला पाठविले आहे. ‘वैध मापन शास्त्र विभागातर्फे साखर कारखाने व खासगी वजन काट्यांची पडताळणी करून ते प्रमाणित केले जातात.
त्यासाठी वैध मापन शास्त्र नियमानुसार एकसमान कार्यपद्धती अवलंबिण्यात येते,’ असेही या पत्रात नमूद आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर मोजलेला ऊस आता साखर कारखान्यांना नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलनस्थळी येत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखान्यांना नाकारता येणार नसून, याबाबत साखर कारखान्यांना सूचना देण्यासाठी परिपत्रक काढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.