राज्यात यंदा केळी लागवडीत फारशी वाढ होणार नाही. एकूण लागवड ८३ हजार हेक्टरवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. सध्या खानदेशात कांदेबाग (ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची लागवड वेगात सुरू आहे.
राज्यात मागील हंगामात ८२ हजार हेक्टरवर केळी लागवड झाली होती. खानदेशात मृग बहर (जून ते ऑगस्टमधील लागवडीच्या बागा) व कांदेबाग केळीची लागवड अधिक असते. मागील हंगामात खानदेशात सुमारे ६० हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. तर राज्यात सुमारे ८२ हजार हेक्टरवर ही लागवड होती.
खानदेशपाठोपाठ पुणे विभागात अधिकची लागवड झाली होती. ही लागवड सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत अधिक होती. मागील तीन वर्षे राज्यात पाऊसमान चांगले आहे. परंतु केळी लागवड ८१ ते ८३ हजार हेक्टरदरम्यान स्थिर आहे.
यंदा लागवड मागील हंगामाच्या तुलनेत किंचित वाढून ती ८३ हजार हेक्टरपर्यंत जाईल. लागवडीत तीन ते चार हजार हेक्टरने वाढ शक्य होती. परंतु सोलापूरच्या उजनी व इतर भागांत ऊसतोड उशिरा झाली. यामुळे या भागांत अपेक्षित लागवड झाली नाही.
तसेच खानदेशातही शेतकरी लागवड स्थिर ठेवून उत्पादकता वाढविण्यासंबंधी कार्यवाहीवर भर देत आहेत. काही शेतकऱ्यांनी लागवड कमी करून फ्रूट केअर तंत्रावर अधिकचा खर्च करण्यास पसंती दिली आहे. यामुळे उत्पादन व उत्पन्न वाढल्याचा अनुभव आहे. यामुळे खानदेशातही केळी लागवड ६० हजार हेक्टरपर्यंतच राहील.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात लागवडीत वाढ : देशात केळी लागवडीत राज्य मागे आहे. परंतु उत्पादकता राज्याने टिकवून ठेवली आहे. यातच उत्तर प्रदेशात केळी लागवड वाढत आहे. मध्य प्रदेशातही नर्मदा, तापी नदीच्या लाभक्षेत्रात लागवड वाढत आहे. मध्य प्रदेशातील लागवड २७ हजार हेक्टरवर पोचली आहे. बऱ्हाणपूर, नेपानगर, बडवानी जिल्हा केळी लागवडीत आघाडी घेत आहे. देशात सर्वाधिक एक लाख १० हजार हेक्टरवर केळी लागवड कर्नाटकात अपेक्षित आहे.
राज्यात पाऊसमान चांगले आहे. परंतु केळी लागवडीसाठी अपेक्षित क्षेत्र उपलब्ध नाही. सोलापूर व जळगाव जिल्ह्यांत लागवड स्थिर राहील. शेतकरी क्षेत्र वाढवून अधिकचा खर्च करण्याएेवजी लागवड स्थिर ठेवून त्यात फ्रूट केअर व इतर तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार केळी उत्पादनाकडे व��त आहेत. यामुळे केळी लागवडीत मोठी वाढ राज्यात दिसत नाही. – के. बी. पाटील, केळी तज्ज्ञ, जळगाव