बारामती जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सध्या जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. निरा खोर्यातील भाटघर, वीर, गुंजवणी व निरा-देवघरमध्ये 48 टीएमसी पाणीसाठा आहे. निरा उजवा कालव्यातून 27 टीएमसी आणि निरा डावा कालव्यातून 15.25 टीएमसी पाणीवापर मंजूर आहे. सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी मंजूर पाणीवापरानुसार मुबलक पाणी उपलब्ध असून, निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालव्यातून रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्यात येणार आहेत.
रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 22 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. पहिले आवर्तन 14 जानेवारीपर्यंत पूर्ण करून दुसरे आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीने केले आहे. यास नुकतीच मान्यता मिळाल्याने पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे सध्याच्या गहू आणि हरभरा या पिकांना पाणी उपलब्ध झाल्याने रब्बीची पेरणी सुरू झाली आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने ऊसतोडणी झालेल्या शेतात शेतकरी गव्हाची आणि हरभर्याची पिके घेत आहेत. बारामती तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महिनाभर शेतकर्यांना पाण्याची गरज भासली नाही. जलसंपदा विभागाने उन्हाळ्यापर्यंत शेतीला वेळेत आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्यांना उन्हाळा सुसह्य जाणार आहे.