सोलापूर : मागील तीन-चार वर्षांचा अंदाज घेऊन यंदा दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी जुना माल ठेवला होता. मात्र, दिवाळीनंतर नवीन कांदा बाजार येत असल्याने भाव स्थिरच राहिला आहे. त्यामुळे मे-जूनमध्ये ३५०० रुपये भाव असतानाही ठेवलेला कांदा आता १५०० ते २००० रुपयाला विकत आहे. त्यात परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा लागवड केल्याने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्यात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असतो. लासलगावच्या कांदा मार्केटलाही मागे टाकत सोलापूर पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. त्यामुळे अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे, विजयपूर व कलबुर्गी येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक असते. कोरोनाच्या आधी म्हणजे चार वर्षांपूर्वी कांद्याला चांगला दर मिळाला होता. तेव्हापासून सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढल्याचे दिसून येत आहे.
सोलापूरचा कांदा जातोय कोलकात्याला..
सोलापूर मार्केटमधील कांदा कोलकात्यापर्यंत जातो. याशिवाय आंध्र प्रदेशातील हैदराबाद, जहिराबाद, निजामाबाद, विजयवाडा, राजमंत्री व तामिळनाडूतील चेन्नई, सेडम, कुंभकोलम, तेलंगणा, कर्नाटकातील बंगळुरु, चित्रदुर्ग, तुमकूर, राणीबेन्नुर मार्केटमध्ये कांदा जातो. सोलापूरच्या कांद्याला मोठी मागणी आहे.
दर स्थिरच..
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यानंतर मे व जूनमध्ये कांदा विक्रीला येणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेने दिवाळीमध्ये विक्रीला आणण्याचा विचार केला. मात्र, दिवाळीनंतर नवीन कांदा येत आहे. सध्या दररोज साधारण १५० गाड्यांमध्ये ५० गाड्या नवीन कांदा येत आहे. त्यामुळे दर स्थिरच राहिलेला आहे.
सध्या साधारण १०० ते ३००० रुपयांपर्यंत दर आहे. सरासरी १३०० रुपये दर मिळत आहे. मे-जूनमध्ये ३५०० रुपये दर असतानाही विक्री न केलेले शेतकरी आता १५०० ते २००० रुपयांना विकत आहे. त्यामुळे साठवण करून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
चार वर्षांपूर्वी दिवसाला १३०० गाड्यांची आवक
चार वर्षापूर्वी डिसेंबर व जानेवारी महिन्यात कांद्याची मोठी आवक होती. मकर संक्रांतच्या काळात १३०० गाड्यांची आवक होती. सरासरी ८०० ते १२०० गाड्यांची आवक होती. यंदाही जानेवारी महिन्यात नवीन कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
आजही ४५ टक्के जुना कांदा
दिवाळीपूर्वी जुना कांदा संपून मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक असते. मात्र, यंदा दर वाढेल म्हणून जुना कांद्याचा स्टॉक ठेवला आहे. त्यामुळे भिगवण, कर्जत, करमाळा, वीट या पट्ट्यांत आजही आठ ते नऊ महिन्यांचा जुना कांदा आहे. जवळपास ४५ टक्के जुना कांदा आजही शेतकऱ्यांकडे आहे. तो आता विक्रीला येत आहे.
सध्या आंध्र प्रदेशामध्ये सण-उत्सव सुरु • आहेत, त्यामुळे कांद्याला मागणी मोठी आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून दर स्थिरच आहे. पुढेही दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. तो कांदा आता जानेवारीमध्ये येईल. तेव्हा मोठी आवक असल्याची शक्यता आहे. -केदारनाथ उंबरजे, कांदा व्यापारी.