पुणेः ब्राझीलमधून होणारी सोयाबीन आणि सोयापेंड निर्यात नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली होती. मात्र मागील वर्षी नोव्हेंबरमधील झालेल्या निर्यातीपेक्षा जास्त होती, असे ब्राझील कस्टम विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
ब्राझीलमधून होणारी सोयाबीन निर्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४० लाख टन सोयाबीन विविध देशांना निर्यात केली होती. मात्र नोव्हेंबरमधील मका निर्यात २६ लाख टनांपर्यंत कमी झाली.
पण तरीही मागणीवर्षीच्या याच महिन्यात २५ लाख टनांवर निर्यात स्थिरावली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा निर्यात २ टक्क्यांनी जास्त झाली. मात्र डिसेंबर महिन्यातील निर्यात २० लाख टनांवरच स्थिरावू शकते, असा अंदाज येथील निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.
नोव्हेंबरमध्ये ब्राझीलची सोयापेंड निर्यात घटली आहे. ऑक्टोबरमध्ये १८ लाख टनांवर सोयापेंड निर्यात झाली होती. ती नोव्हेंबरमध्ये १६ लाख टनांपर्यंत कमी झाली. मात्र मागीलवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ही निर्यात २३ टक्क्यांनी जास्त होती.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात १३ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती. तर डिसेंबरमधील सोयापेंड निर्यात १५ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्यात ब्राझीलने जवळपास अडीच लाख टन सोयातेल निर्यात केली होती. यंदाच्या नोव्हेंबरमधील सोयातेल निर्यात ३४ टक्क्यांनी जास्त होती. मागीलवर्षी यात महिन्यात ब्राझीलने १ लाख ७९ हजार टन सोयातेल निर्यात केली होती.