आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन Soybean आणि सोयापेंडच्या Soyapend दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयातेलाचे Soyaoil दरही निचांकी पातळीवरून काहीसे सुधारले आहेत. मात्र देशातील सोयाबीन बाजारावर त्याचा परिणाम जाणवला नाही. देशातील सोयाबीन दर आजही स्थिर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराने काल मागील आठवडाभरात उच्चांकी टप्पा गाठल्यानंतर दर पुन्हा नरमले होते. मात्र आज बाजार सुरु झाल्यापासूनच सोयाबीनचे दर तेजीत होते. आज सोयाबीन १४.६२ डाॅलर प्रतिटनाने विकले गेले. तसंच सोयाबीन तेलाने काल मागील पाच महिन्यांतील निचांकी दराचा टप्पा गाठला होता. सोयाबीनचे दर ६१.३३ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत नरमले होते. त्यात आज काहीशी सुधारणा झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयापेंडने मागील चार महिन्यांतील उचांकी दर गाठला. आज सोयापेंडचे दर ४५३.५३ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. सोयाबीनच्या नव्या हंगामातील आतापर्यंतचा हा विक्रमी दर ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले, मात्र सोयातेल अद्यापही दबावात आहेत.
पण देशातील बाजारात सोयाबीन आजही स्थिर होते. बाजारातून मिळालेल्या माहीतीनुसार आज देशात सरासरी तीन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आजही मध्य प्रदेशातील आवक तुलनेत जास्त होती. मध्य प्रदेशात आज जवळपास सव्वालाख टन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आले होते. या सोयाबीनला सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.
राज्यातील बाजारात काय दर मिळाला?
महाराष्ट्रातील सोयाबीन आवक काहीशी घटली होती. राज्यात आज जवळपास एक लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. राज्यातील सोयाबीन दर आजही स्थिर होते. सोयाबीन सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान दर होते. तर प्रक्रिया प्लांट्सच्या दरातही फारसा बदल झाला नाही. आजही प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ६०० ते ५ हजार ७५० रुपयांपर्यंत होते.
दर वाढतील का?
बाजारात दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली. त्यामुळे दर जास्त दबावात आले नाहीत. सोयाबीनचा भाव स्थिर नरमलेल्या पातळीवर स्थिर राहीला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. याचा लाभ देशातील सोयाबीन बाजारालाही होऊ शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.