खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये तरकारी विभागात पालेभाज्या आणि फळभाज्यांची प्रचंड आवक झाल्याने सर्व मालाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. पालेभाज्या 1 ते 2 रुपये गड्डी या दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मार्केट पर्यंत शेतमाल घेवून येण्याचे भाडे देखील वसूल झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
चाकण मधील घाऊक भाजीपाला बाजारात खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या मेथी व शेपूला बुधवारी अवघा 4 ते 5 रुपये दर मिळाला. कोथिंबीर अवघ्या 1 ते 2 रुपये गड्डी दराने विक्री झाली. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. हिवाळा सुरू झाला असून थंडीची चाहूल लागली आहे. पालेभाज्यांसाठी थंडीचे वातावरण पोषक असते. थंड हवेत पालेभाज्यांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे या हंगामात पालेभाज्यांचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे आता पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन निघत असून घाऊक बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
खूप मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले असून नागरिकांसाठी स्वस्त पालेभाज्यांचा हंगाम सुरू झालेला आहे; मात्र बाजारात माल घेऊन येण्याचे गाडीभाडे देखील वसूल होत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत.
डिसेंबर महिन्यात पालेभाज्यांचा स्वस्ताईचा हंगाम सुरु होतो. या हंगामात पालेभाज्या स्वस्त होतात, विशेषकरून मेथी, कोथिंबीर जास्त प्रमाणात आणि कमी दरात उपलब्ध होते. पालेभाज्यांच्या हजारो जुड्या दररोज घाऊक बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे.
केवळ पालक भाजीची आवक कमी असल्याने पालकला 8 ते 10 रुपये गड्डी असा दर मिळत आहे. हिरवी मिरची, कोबी, शेवगा, गाजर, घेवडा, पावटा आदी सर्वच फळभाज्यांची आवक देखील वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत. वाटणा अवघा 40 रुपये किलो दराने मार्केट मध्ये उपलब्ध असल्याने चाकण मार्केटचे अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष कुमार गोरे व शेतकऱ्यांनी सांगितले.