खरीप अन् रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शेतकर्यांचे काहीही देणेघेणे नाही, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखाना येथे आयोजित राष्ट्रवादी काँगे्रसच्या संवाद मेळाव्यात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष राहुल जगताप होते. व्यासपीठावर बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहटा, घनश्याम शेलार, कल्याणी लोखंडे, डॉ.प्रनोती जगताप, मोहन आढाव, विवेक पाटील, संदीप सोनलकर, रोहिदास कदम, सोमनाथ वाखारे उपस्थित होते.
पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना राज्यातील शेतकर्यांना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून मदत केली, पीक विमा मिळवून दिला. आता मात्र पीक विमा म्हणजे फक्त विमा कंपन्यांची धन असून, विमा कंपन्यांनी शेतकर्यांचे हजारो कोटी रुपये बुडविले आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकर्यांना चांगले दिवस आहेत. मात्र, या सरकारने वीजजोड तोडणीचा सपाटा लावल्याने शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. आमचे सरकार असताना पूर्वीच्या सरकारमधील सुरू असलेली विकासकामे आम्ही पुढे चालू ठेवली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार येताच आकसापोटी आम्ही मंजूर केलेली विकासकामे थांबविली असल्याची खंत यावेळी व्यक्त केली.
माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, श्रीगोंदा तालुका हा पवारांच्या विचारांचा तालुका आहे. राज्यात अजित पवार यांची लाट सुरू झाली आहे. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता आपल्याला जोमाने लढावे लागणार आहे. पुढील येणार्या सर्व निवडणुका या स्वतंत्र आणि स्वबळावर लढणार आहोत. भाजप सरकार हे शेतकर्यांचा कणा मोडण्याचे काम करत असून, शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. मात्र, शेतकर्यांच्या पाठीशी फक्त पवार कुटुंब राहत असून, शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, अशीच भूमिका त्यांनी कायम घेतली आहे. शेतकर्यांच्या हिताचे काम केलेल्या स्व. कुंडलिक जगताप आणि स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या आजारपणाची लोकप्रतिनिधींनी टिंगल केली. मात्र, आता याच लोकप्रतिनिधींनी आता आजारपणाचे सोंग घेतले आहे. इतर ठिकाणी तासन्तास बोलणारे लोकप्रतिनिधी हे विकासाच्या आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल जगताप यांनी केला. हरिदास शिर्के यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ बारगुजे यांनी आभार मानले.
लोकप्रतिनिधींनी कामे खेचून आणायची असतात आणि लोकांनी देखील त्याचसाठी त्यांना निवडून दिलेले असते. मात्र, तुमच्या तालुक्यात रस्त्यांची अवस्था लय वंगाळ झाली आहे. शेतकरी प्रश्नावर देखील ते बोलत नाहीत. येथील आमदार काय करत आहेत? असा सवाल अजित पवार यांनी केला.