नाशिक : पूरपरिस्थितीमुळे पाकिस्तानच्या कांद्याचे नुकसान झाल्याने आशियाई देशांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट ते तिपटीने जास्त लाल कांद्याची मागणी वाढली आहे. त्याचे थेट परिणाम बाजारपेठेत दिसत असून, लाल कांद्याचे दर क्विंटलमागे पन्नास ते दोनशे रुपयांनी वाढण्यास मदत झाली आहे.
चीनमध्ये उत्पादित झालेल्या कांद्याचा आकार सत्तर मिलिमीटरहून अधिक असल्याने थायलंडमधून आपल्याकडील लाल कांद्याची मागणी सुरू झाली आहे. किमान दोन महिने थायलंडमध्ये निर्यात होईल, असा निर्यातदारांचा अंदाज आहे. चीनमधील ‘मेगा साइज’मुळे आशियाई देशातील ग्राहकांची महाराष्ट्रातील लाल कांद्याला पसंती मिळत आहे.
पिंपळगाव बसवंतमध्ये शनिवारी (ता. १७) एक हजार ६५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने लाल कांद्याची विक्री झाली होती. आज तिथे एक हजार ७०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला. आशियाई देशातील मागणी वाढल्याने निर्यातदारांनी लाल कांद्याच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित केले आहे. राजस्थानमधील कांदा अंतिम टप्प्यात पोचला असून, गुजरातमधील कांदा आणखी दोन महिन्यांनी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
उन्हाळ कांदा शेतकऱ्यांच्या चाळीत अजूनही आहे. मात्र हा नेमका किती कांदा शिल्लक आहे, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र बाजारातील उन्हाळ कांद्याची आवक मंदावली आहे. उन्हाळ कांद्याची शेतकरी पूर्वी सलग लागवड करत असत. आता नोव्हेंबरपासून लागवड सुरू केली असून, २५ डिसेंबरपर्यंत लागवड पूर्ण व्हावी, असा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.
🔹एकराला १३ हजारांची मजुरी : उन्हाळ कांद्याच्या लागवडीला एकराला १३ हजार रुपये मजुरी द्यावी लागत असल्याचे शेतकरी यशवंत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की रोपे उपटून लागवडीचे काम त्यात समाविष्ट आहे. सायंकाळपर्यंत सव्वा एकरातील लागवड पूर्ण होते. उन्हाळ कांद्याची बियाणे २४ हजार रुपयांमध्ये विकत घेतले आहे. रोप लागवडीपर्यंत ४० हजारांचा खर्च झालाय. काढणीपर्यंत सर्वसाधारपणे एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागेल.
🔹लाल कांद्याच्या निर्यातीचा दर (आकडे टनाला डॉलरमध्ये)
० सिंगापूर-३८०
० मलेशिया-३४० ते ३५०
० आखाती देश-३५० ते ३८०
० बांगलादेश-३२० ते ३३०
० श्रीलंका- वातानुकूलित कंटेनरमधून ४००
० थायलंड-४००
💬”आखाती देशांमध्ये लाल कांद्याला चांगली मागणी असल्याने काही दिवसांमध्ये किलोला एक ते दोन रुपयांनी भावात वाढ होण्याची शक्यता आहे. थायलंडमध्ये स्थानिक कांदा आहे. मात्र तो आयात केलेल्या कांद्यापेक्षा अधिक महाग असल्याने थायलंडमध्ये लाल कांद्याची निर्यात चांगली होत आहे. आणखी दीड महिने भारतीय कांद्यासाठी जागतिक स्तरावरील स्पर्धक देशाचा कांदा उपलब्ध नसेल.” – विकास सिंह, कांदा निर्यातदार
सौजन्य : सकाळ