सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूर बाजार समितीला पुढील आठवड्यात १३, १४ आणि १५ जानेवारी असे तीन दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे या तीनही दिवशी कांद्याचे लिवाव बंद राहणार आहेत. त्यादृष्टीने कांदा आणू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी होत आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही मकर संक्रांत आणि सिद्धेश्वर यात्रा या दरम्यान ही सुट्टी दिली जाते. १३ जानेवारीला बाजार समिती सुरू असणार आहे. पण या दिवशी कांद्याचे लिलाव होणार नाहीत. तर १४ आणि १५ जानेवारीला बाजार समितीला सुट्टी असणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशीही लिलाव होणार नाहीत.
या प्रमाणे एकूण सलग तीन दिवस ही सुट्टी असणार आहे. सध्या कांद्याचा हंगाम सुरू असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू आहे, कांद्याची रोज ५०० गाड्यांच्याही पुढे आवक होते आहे. दर मात्र काहीसे स्थिर आहेत.
कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० ते २५०० रुपये असे दर आहेत. बाजार समितीच्या या सुट्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्याचे नियोजन करावे, असे आवाहन बाजार समितीच्या प्रशासनाने केले आहे.