जनावरांचे संगोपन करत असताना पशुपालकाला अनेक प्रश्न पडत असतात. काही वेळेस जनावरांचे योग्य व्यवस्थापन करुन सुद्धा म्हणावा तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे जनावरांचे दूध कमी होणे, पोटदुखी, जुलाब अशा समस्या निर्माण होतात. या समस्या छोट्या वाटत असल्या तरी यातून होणारे नूकसान मोठे असते. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने पशुपालकांना येणाऱ्या पुढील समस्यांवर काही उपाययोजना सांगितल्या आहेत, त्या पाहुया.
१) म्हैस दूध कमी देत असेल तर कोणते खाद्य खाऊ घालावे ?
म्हशींना हिरवा चारा आणि वाळलेला चारा समप्रमाणात द्यावा. पाच लिटर दूध देणाऱ्या म्हशीला कमीत कमी तीन किलो सुग्रास किंवा आंबवण द्यावे. जनावरांना कोणत्याही लसीकरणापूर्वी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
२) पावसाळ्यात जनावरांचे दूध पातळ का होते?
पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे जनावरांना फक्त हिरवा चारा खाऊ घातला जातो. कोरडा चारा जनावरांना न दिल्यामुळे त्यांचे दूध पातळ होते. कारण दुधातील घट्टपणा हा चाऱ्यातील तंतुमय पदार्थांवर अवलंबून असतो. कोरड्या, वाळलेल्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. म्हणून हिरवा आणि वाळलेला चारा दोन्ही समान प्रमाणात द्यावे.
३) जनावराने अखाद्य व अणकुचीदार वस्तू खाल्ल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात ?
मुळात ही समस्या उद्भवू नये म्हणून जनावरांच्या खाद्यामध्ये योग्य प्रमाणात फॉस्फरस या क्षाराचे प्रमाण राखावे. जनावरांना वाळलेला आणि ओला चारा देताना त्यामध्ये अखाद्य वस्तू तर गेली तर नाही ना याची तपासणी करावी. जनावरांना चारा देण्याअगोदर त्यामधून शक्य असल्यास लोहचुंबक फिरवावे. त्यामुळे लोखंडी वस्तू चुंबकाला चिकटून वेगळ्या होतील. गोठ्यातील जुनी भांडी, तारेचे कुंपण, खिळे इत्यादी जनावरांपासून दूर ठेवावेत. लोखंडी तुकडे, सुई, दाभण, कुंपणाच्या तारांचे तुकडे इत्यादी वस्तू चाऱ्याबरोबर जनावरांच्या पोटात गेल्यावर वेळेत उपचार व्हायला पाहिजेत. नाही तर हृदयरोगाने किंवा इतर असाध्य रोगाने जनावर दगावते. कधी कधी जनावरांच्या खाद्यातील फॉस्फरस या क्षाराच्या कमतरतेमुळे होणाऱ्या पायका रोगामुळे ही समस्या वाढते. जनावरांच्या गर्भावस्थेत त्यांच्या रूमेन आणि रेटीक्युलम या पोटांच्या भागाच्या आकुंचन पावण्याच्या क्रियेमध्ये देखील ही समस्या वाढू शकते.