सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 2 लाख 54 हजार 691 बाधित शेतकर्यांना शासनाने आर्थिक दिलासा दिला. शेतपिकांच्या नुकसानीपोटी दुपट दराने नुकसानभरपाई मंजूर केली आहे. त्यासाठी 291 कोटी 4 लाख 56 हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये 13 लाख 23 हजार रुपयांचा निधी शेतजमिनीच्या नुकसानीचा समावेश आहे. बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर लवकरच नुकसानीची रक्कम जमा होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पिके जोमात असताना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली.
या अतिवृष्टीच्या फटक्यात काढणीला ओल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांतील बाधित पिकांचे पंचनामे केले. बाधित शेतपिकांना यंदा दुपटीने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तीन हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर शेतपिके, शेतजमिनीचे हेक्टरी नुकसान आणि आवश्यक असणारी नुकसानभरपाई यांचा अहवाल शासनाकडे पाठीविला होता. जिल्हा प्रशासनाने 290 कोटी 91 लाख 425 रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने 11 जानेवारी रोजी अध्यादेश जारी केला. शेतपिकांच्या नुकसानीपोटी 290 कोटी 91 लाख 33 हजार, तर 46.64 हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 13 लाख 23 हजार असे एकूण 291 कोटी 4 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर थेट नुकसानभरपाईची रक्कम जमा करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. लाभार्थी शेतकरी आणि त्यांना वाटप केलेला निधी याची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचे आदेश दिले आहेत.
सततच्या पावसाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष
सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका सात लाख शेतकर्यांना बसला आहे. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस या दोन्हीमुळे शेतकर्यांना 881 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे
पाठविला होता. शासनाने सध्या तरी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
बाधित शेतकर्यांना 291 कोटींची आर्थिक मदत उपलब्ध केली आहे.
सप्टेंबरची अतिवृष्टी
बाधित शेतपिके हेक्टरी
33 हजार 726.83
बाधित शेतकरी संख्या
52 हजार 832
ऑक्टोबर अतिवृष्टी
बाधित शेतपिके हेक्टरी
1 लाख 21 हजार 628.88 हेक्टर
बाधित शेतकरी संख्या
2 लाख 1 हजार 859