देशात 2022-23 या चालू वर्षीच्या ऊस गाळप हंगामात 15 जानेवारीअखेर 515 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून, आतापर्यंत एकूण 1 हजार 680 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 123 लाख टनांनी जास्त आहे. यंदाच्या हंगामात नवीन साखरेचे आतापर्यंतचे 160 लाख टन उत्पादन झाले असून, ते गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा 10 लाख टनांनी अधिक आहे. मात्र, संपूर्ण हंगामानंतर यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे 16 लाख टनांनी साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज ’राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा’ने वर्तविला आहे.
देशभरातील यंदाचा गाळप हंगामात सुमारे 343 लाख टन नवे साखर उत्पादन हाती येईल. जे गतवर्षीच्या 359 लाख टनाच्या तुलनेत सुमारे 16 लाख टनांनी कमी असण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख टन साखरेचे उत्पादन हे इथेनॉल निर्मितीकडे वळविले जाणार असल्याने पुन्हा एकदा यंदाच्या वर्षी एकूण साखर उत्पादन विक्रमी 390 लाख टन होईल असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केले आहे.
’एकूण 390 लाख टन नवे साखर उत्पादन व हंगामाच्या सुरुवातीची शिल्लक 61 लाख टन लक्षात घेता ढोबळमानाने एकूण 451 लाख टन साखरेपैकी 275 लाख टनाचा स्थानिक खप, 45 लाख टनाचा इथेनॉलसाठी वापर आणि 64 लाख टनाची अपेक्षित निर्यात लक्षात घेता, हंगामाअखेर सुमारे 67 लाख टन साखर शिल्लक राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. ती साखर देशातील अडीच महिन्यांची स्थानिक मागणी भागवू शकते.
या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कारखाना स्तरावरील साखर विक्रीदरावर काहीसा दबाव राहून ते दर रु. 3150 ते 3200 प्रति क्विंटल (एस ग्रेड ) आणि रु. 3300 ते 3450 प्रति क्विंटल (एम ग्रेड) राहणे अपेक्षित आहे’ इथेनॉलच्या खरेदीदरात आणखी वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे इथेनॉलसंदर्भात नजीकच्या भविष्यात काही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहेत. असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.