देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात काहीशी सुधारणा झाली आहे. सध्या किमान दरपातळी कायम असली तरी कमाल दरानं मात्र चांगलीच झेप घेतली. राज्य आणि देशातील काही बाजारांमध्ये कापसाच्या कमाल दराने ८८५० रुपयांचा टप्पा गाठला होता.
देशातील बाजारात सध्या कापसाची आवक वाढली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापसाचे भाव तब्बल एक महिना नरमलेले होते. या महिनाभरात दर कमीच झाले. दरात सुधारणा पाहायला मिळाली नाही.
तसेच बाजारात कापसाची आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरुवातीला देशपातळीवर दैनंदीन ९० हजार लाख गाठींच्या दरम्यान आवक होती. मात्र आता ती वाढून सव्वा ते दीड लाख गाठींच्या दरम्यान पोचली. आजही देशातील बाजारात १ लाख ३६ हजार गाठी कापूस आल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
दराचा विचार करता आज, अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. कमाल दराचा विचार करता आज महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात बाजारात कापसाला कमाल ८ हजार ८५० रुपयांचा दर मिळाला.
तर किमान दर आजही बहुतांशी ठिकाणी ७ हजार रुपयांपासून सुरु झाला. महाराष्ट्रातील अकोट बाजारात ८ हजार ८४५ रुपये दर मिळाला होता. देशातील सरासरी दरपातळी आज ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचली होती.
देशातील वायदे
वायद्यांचा विचार करता एमसीएक्सवरील वायद्यांमध्ये आज वाढ झाली होती. आज एप्रिलच्या डिलिवरीच्या वायद्यांमध्ये १८० रुपयांची सुधारणा झाली होती.
वायदे ६४ हजार २० रुपये प्रतिखंडीवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्ये २६० रुपयांची सुधारणा होऊन वायदे ६४ हजार ५०० रुपये प्रतिखंडीने पार पडले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर प्रत्यक्ष खरेदीचे दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स १००.८५ संट प्रतिपाऊंडवर होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर टिकून आहेत. चीन आणि पाकिस्तान अमेरिकेचा कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे कापसाचे भाव कायम आहेत.
दर सुधारु शकतात
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत. नुकतेच युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. तर काॅटन असोसिएशन ऑफ इंडिनाने देशातील कापूस उत्पादन ३२१ लाख गाठींवर स्थिरावेल, असे सांगितले.
त्यातच देशातील उद्योग जवळपास पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. निर्यातही सुरु झाली. त्यामुळे कापूस दरात सुधारणा होऊ शकते. कापसाचे भाव ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, अशा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला