औषधी व सुगंधी वेखंड
बाजारात वेखंड या नावाने या वनस्पतीच्या खोडाचे सुके तुकडे मिळतात. त्यांचे चूर्ण औषधी व सुगंधी असते. त्याला काहीशी कडू व तिखट चव असते. जिन, बिअर ही मद्ये किंवा शिर्का (व्हिनेगर) इत्यादींना स्वाद येण्यास व काही सुगंधी द्रव्यांत वेखंड वापरतात. सुजेवर आंबेहळद व वेखंड यांचा उगाळून लेप देतात. वेखंड वांतिकारक व दीपक (भूक वाढविणारे) असून भूक न लागणे, पोटदुखी, ताप, दमा, खोकला, श्वासनलिकादाह (घशातील खवखव) इत्यादींवर व मुलांना आमांशावर ते देतात. ते आकडीरोधक व तंत्रिका (मज्जा) शक्तिवर्धक आहे. ते मानसिक विकृतींवरही उपयुक्त आहे. स्त्रियांना प्रसूतिसमयी वेणांचा जोर वाढविण्यास केशर व पिंपळी मुळाबरोबर वेखंड देतात; बाळंतपणातही देतात. अंगदुखी व सर्दी यांवर वेखंड चूर्ण अंगास चोळतात व पोटातही देतात. तान्ह्या मुलांच्या तक्रारींवर वेखंड उपयुक्त ठरले आहे. वेखंडाच्या चूर्णाच्या वासाने ढेकूण, पिसवा, उवा इ. कीटक दूर जातात. सुकलेल्या वेखंडाच्या खोडात १.५-३.५% पिवळट व उडून जाणारे सुगंधी तेल असते. मुळात अॅकॉरीन हे ग्लुकोसाइड असते; त्यांचे चूर्ण कृमिउत्सर्जक (जंत पाडून टाकणारे) असते. इराणी वेखंड काळसर व अधिक सुगंधी असते.
लागवड, मशागत इ.
हलकी गाळाची व दुमट जमीन ह्या पिकास चांगली असते. मागील वर्षातील खोडांची शेंडे सु. ३० सेंमी अंतराने लावतात; तत्पूर्वी प्रथम एकदा पाणी देऊन शेत नांगरतात व हिरवे खत देतात. पेरणीत पानांचे झुपके जमिनीवर राखून ठेवतात. सुमारे एक वर्षभर वाढल्यावर पीक काढतात; त्या वेळी खोडांची शेंडे कापून पुढील लागवडीसाठी राखून ठेवतात. उरलेल्या खोडांची तुकडे उन्हात चांगले वाळवून नंतर विक्रीस आणतात. कर्नाटकातील कोरटगिरी तालुक्यात याची लागवड केलेली आढळते. दर हेक्टरी सु. ३,४०० किग्रॅ. सुके तुकडे निघतात.
अॅकॉरस ग्रॅमिनीयस ही वेखंडाची दुसरी (जपानी) जाती सिक्कीममध्ये (सु. १,८०० मी. उंचीपर्यंत) व खासी टेकडयांत (सु. १,२००-१,५०० मी. उंचीपर्यंत) आढळते. तिचे गुणधर्म वर वर्णन केल्याप्रमाणे असतात.

