राज्यासह देशातील हरभरा काढणी आता वेगाने सुरु झाली. पण हरभरा काढणी जसजशी पुढं सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे. त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. देशात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड महाराष्ट्रात आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील उत्पादकता यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी राहणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातही हरभरा पिकाला उन्हाचा फटका बसतोय. राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा हरभरा लागवडच कमी झाली होती.
त्यामुळं उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्येही लागवड ३० टक्क्यांपर्यंत कमी राहिल्याचं राज्य सरकरानं स्पष्ट केलं. मागील काही महिन्यांपासून हरभरा बाजारावर नाफेडच्या विक्रीचा दबाव राहिला.
सध्या नाफेडकडे १४ ते १५ लाख टन हरभऱ्याचा स्टाॅक असण्याची शक्यता आहे. पण नाफेड लवकरच हरभरा विक्री बंद करण्याची शक्यता आहे. नाफेडची खरेदी सुरु होणार आहे. मागील काही दिवसांपासून दिवसा तापमान जास्त वाढतंय. त्यामुळं हरभरा उत्पादता घट पुढे येत आहे.
बाजाराचे लक्ष सध्या महाराष्ट्रातील उत्पादतेकडे आहे. राज्यात उत्पादकता कमी येत असल्यानं बाजारावर त्याचा परिणामही दिसत आहे. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळतोय.
मात्र उत्पादकता जास्त घटल्यास खुल्या बाजारात हरभरा हमीभावाचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

