भारत खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार आहे. देशातील तेलबियांचे दर कमी झाल्यामुळे भारत पामतेल आयातीवरील शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती सरकार आणि उद्योगाच्या सुत्रांनी दिल्याचे वृत्त राॅयटर्स या संस्थेने दिले.
पामतेल आयात शुल्कात वाढ केल्यास देशातील खाद्यतेलाचे दर सुधारतील. देशातील मोहरीचे दर सुधारण्यासाठी आम्ही पामतेल आयातीवरील शुल्क वाढीचा प्रस्ताव दिला आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितल्याचं राॅयटर्सने म्हटले आहे.
मोहरी हे रब्बीतील महत्वाचे तेलबिया पीक आहे. मोहरीची लागवड ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होते. तर काढणी मार्चपासून सुरु होते. गेल्या हंगामात चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड वाढवली. पण सध्या मोहरीच्या भावावर दबाव आला आहे.
मागील काही महिन्यांमध्ये देशात खाद्यतेलाची आयात वाढल्याचा दबाव मोहरी तेलावर आला. यंदा सरकारने मोहरीसाठी ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. पण मोहरीचे दर ५ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळं सरकार पामतेल आयात शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे.
सध्याचे आयातशुल्क
केंद्राने पामतेलावरील आयात शुल्क मागीलवर्षी कमी करून ५.५ टक्क्यांवर आणले आहे. तर रिफाईंड पामतेलावर १२.५ टक्के आयातशुल्क आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यानंतर भारत सरकार आयातशुल्क वाढविण्याच्या विचारात आहे.
वाढती महागाई सरकारसाठी चिंतेची बाब आहे. पण खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं राॅयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी
नव्या हंगामातील मोहरी उत्पादनामुळे दरावर दबाव आला. त्यामुळं मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सरकारने आयातशुल्काचा दर ठरवला आहे. यामुळे देशातील दराचा बेंचमार्क तयार होईल, असेही सुत्रांनी सांगितल्याचे राॅयटर्सने म्हटले आहे.