अर्जेंटीनातील उत्पादन घट आणि ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. पण सरासरी दरपातळी टिकून आहे. सोयाबीनला १५ डाॅलर प्रतिबुशेल्सच्यावर आधार मिळतोय.
तर सोयापेंड ४९० डाॅलरपेक्षा अधिक राहतेय. ब्राझीलमध्ये सध्या सोयाबीन काढणी सुरु आहे. पण पावसामुळे काढणीच्या कामात व्यत्यय येतोय. त्यामुळे काढणीची गती यंदा कमी आहे. त्यातच ब्राझीलमधील शेतकरी चांगल्या दराची चाचपणी करताना दिसत आहेत.
येथील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन विक्री काहीशी कमी केलेली दिसते. चीन यंदा सोयाबीन आयात वाढविणार आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे. भारतातूनही सोयापेंड निर्यात वेगाने सुरु आहे. त्यामुळं सोयाबीनला मागणी आहे.
पण मार्च महिन्यातील व्यवहार आणि शेतकऱ्यांची वाढलेली विक्री, यामुळं दर दबावात आहेत. सध्या सोयाबीनला देशात सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. पण सोयाबीनचे दर सुधारु शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पॅनिक सेलिंग टाळावे.
शेतकऱ्यांनी किमान ५ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. तर चालू हंगामात सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

