गेल्या सप्ताहात होळीनिमित्त शेतीमालाची आवक कमी झाली होती. मात्र ती आता पुन्हा पूर्ववत झाली आहे. कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर आहे.
तूर, हरभरा व हळद यांची आवक वाढत आहे. मका (Maize) व सोयाबीन (Soybean) यांची आवक कमी होत आहे. कांद्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
या सप्ताहात कापूस, मका, हळद व सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमती वाढल्या, तर हरभरा स्थिर होता. टोमॅटोच्या किमती आता वाढू लागल्या आहेत.
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून प्रति खंडी रु. ६२,१२० वर आले होते. याही सप्ताहात ते १.८ टक्क्याने घसरून रु. ६०,९८० वर आले आहेत.
एप्रिल फ्यूचर्स भाव ०.७ टक्क्याने घसरून रु. ६१,४४० वर आले आहेत. जून फ्यूचर्स रु. ६२,५६० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात १.७ टक्क्याने घसरून रु १,५२८ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा १ टक्क्याने घसरून रु. १,५१२ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५९५ आहेत.
कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. सध्याचे बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. कापसाची आवक अजून वाढत्या पातळीवर आहे. भाव घसरत आहेत.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) ०.९ टक्का घसरून ५,४०४ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.९ टक्क्याने घसरून ५,३५३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनच्या भावातील घसरण थांबलेली नाही.

