देशातील बाजारात तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. पण आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आहे. मागील महिनाभरापासून आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांना गरजेपुरती तूर मिळत नाही.
सध्या अनेक बाजारात तुरीचा सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या पुढे गेला. त्यामुळं ८ हजार रुपयांपेक्षा कमी दरात खरेदी केलेली तूर काही व्यापारी बाजारात विकून नफावसुली करताना दिसत आहेत. मागील आठवडाभरात ग्राहक बाजारात तुरीची विक्री वाढलेली दिसली.
त्यामुळं तुरीच्या दरावर दारत क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची तेजी मंदी सुरु आहे. पण तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. एक-दोन बाजारांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला कमाल ९ हजारांचाही दर मिळाला. हिंगणघाट बाजारातील पावत्या सोशल माध्यमांमध्ये फिरत होत्या.
पण एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी. हा भाव खूपच कमी मालाला मिळाला. सरासरी भाव ७ हजार ९०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.
चालू हंगामात तुरीचे उत्पादन घटले. आयातीतूनही गरज पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

