देशातील अनेक राज्यांमध्ये मागील आठवड्यात पावसाने दणका दिला. या पावसामुळे गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाला आणि मसाला पिकांना फटका बसला. त्यामुळं काही पिकांच्या दरात सुधारणा झाली. तर द्राक्षाची गुणवत्ता कमी झाल्याने दर कमी झाले.
मागील १० ते १२ दिवस देशातील विविध भागांमध्ये पाऊस झाला. काढणीच्या टप्प्यातील अनेक पिके पावसात सापडली. त्यामुळं काही पिकांची गुणवत्ता खराब होऊन दर घसरले. तर काही पिकांचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने दरात सुधारणा झाली.
तर पावसामुळे काही पिकांचा बाजारातील पुरवठा कमी झाला. यामुळेही दर वाढले. त्यात काही भाजीपाला, गहू, जिरा, हरभरा आणि द्राक्षासह काही फळपिकांचा समावेश आहे.
गहू रब्बीतील महत्वाचे पीक आहे. सध्या काही भागातील गहू काढणी झाली. पण जवळपास निम्म्यापेक्षा जास्त गहू शेतातच आहे. या गव्हाला पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
तसेच पावसात ओला झालेला गहू १५ दिवस उशीरा बाजारात येऊ शकतो. तसेच पावसामुळे गहू उत्पादन ५ टक्क्यांपर्यंत घटू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे गव्हाच्या दरात जवळपास ४ टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली. गहू पिकाला राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, आणि महाराष्ट्रात फटका बसला.
महाराष्ट्रात यंदा हरभऱ्याचा पेरा जास्त झाला. त्यानंतर मध्य प्रदेशात लागवड झाली. पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बहुतेकहरभरा उत्पादक भागांमध्ये पाऊस झाला. दोन्ही राज्यांमध्ये सध्या निम्म पीक शेतातच आहे. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसला.
जिरा उत्पादनात राजस्थान आघाडीवर आहे. मात्र राजस्थानमध्ये जिरा उत्पादक भागांमध्ये पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिऱ्याच्या दरात ७ टक्यांपर्यंत सुधारणा झाली.
हरभऱ्यालाही आधार
पावसाचा सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रात वाढलेल्या उष्णतेमुळे आधीच २० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटलं. त्यात आता पावसामुळे उत्पादनातील घट ३० ते ४० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
हरभऱ्याला फटका बसल्याने दरात २ टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसली. पुढील काळात उत्पादनात नेमकी किती घट झाली हे स्पष्ट होईल. त्यावेळी हरभरा दराला आणखी आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.