मित्रांनो ऊस पिकाची लागवड शक्यतो फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण करून घ्यावी. फेब्रुवारी नंतर शक्यतो उसाची लागवड करू नये त्यामागे खूप कारणे आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं मार्च महिन्यापासून तापमानात सतत वाढ व्हायला चालू होते. उसाच्या योग्य वाढीसाठी 25°c ते 35°c तापमान गरजेचे असते. सध्या वाढलेले तापमान नवीन लागवड केलेल्या ऊस पिकाच्या वाढीसाठी पोषक नाही. रोपांची किंवा कांडीची लागवड आता केली असता उसाची वाढ पाहिजे अशी होत नाही. सुरवातीला उगवण तसेच जर रोप लागवड असेल तर रोपांचे सेटिंग व्यवस्थित मिळत नाही. त्यासोबत फुटव्यांची आणि वाढीच्या अवस्था एकदम अति तापमानात येते. उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन थोडं जरी मागे-पुढं झालं तर वाढीवर विपरीत परिणाम झालेला आपणास दिसेल.
आता लागवड केलेल्या ऊसाला जवळपास नोव्हेंबर डिसेंबर मध्येच तुरा यायला सुरुवात होतो हा माझा मागील वर्षाचा अनुभव आहे. उसाच्या भरणीचा काळ बरोबर पावसाच्या तोंडावर येतो. वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे भरणी देखील 120 दिवसात होत नाही. त्यामुळे ऐन पावसात भरणी करण्यासाठी समस्या येऊ शकतात. सुरुवातीच्या चार महिन्याचा वाढीचा काळ खूप महत्त्वाचा आहे. या काळात जर उसाची वाढ योग्य पद्धतीने झाली नाही तर नंतर उसाला सूर लागत नाही. उसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव जसे तापमान वाढत जाईल तसे वाढत जातो. जानेवारी पासून एप्रिल पर्यंत खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो. मार्च महिन्यात केलेल्या लागवडीस हमखास प्रादुर्भाव वाढतो व त्यामुळे उसामध्ये गॅप पडतात व एकरी उसाची संख्या भेटत नाही. वरील सर्व कारणांचा विचार केला तर मार्च महिन्यात उसाची अजिबात लागवड करू नये.
नर्सरीच्या माध्यमातून मागील वर्षापासून रोपांचे वितरण आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक गुजरात मध्ये करतोय. यावर्षी कटाक्षाने फेब्रुवारी एन्ड ला रोपवाटिका बंद केली. तरी अजून मार्च आणि एप्रिल महिन्यात शेतकरी रोपांची मागणी करत आहेत. ऊस उत्पादकांनी वरील गोष्टींचा विचार करावा. खर्चाचा ताळमेळ घालून उसाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा. हंगाम बदलून कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्याच्या फंदात पडू नका.
डॉ. अंकुश चोरमुले
आष्टा सांगली

