आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर आज सायंकाळपर्यंत स्थिर होते. कापूस दरानं बॅंकिंग संकट येऊन बाजार कोसळण्यापुर्वीची पातळी गाठली. देशातही वायद्यांमध्ये दर वाढले.
अनेक बाजार समित्यांमध्येही सुधारणा झाली. पण कालपर्यंत छोट्या बाजारांमध्ये दरात वाढ झाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र आज जवळपास सर्वच बाजारांमध्ये सुधारणा दिसून आली.
देशातील वायद्यांमध्ये कापूस दर मागील तीन दिवसांपासून वाढले. वायदे खंडीमागं २ ते अडीच हजाराने सुधारले. म्हणजेच क्विंटलमागं रुईचे वायदे ६०० ते ७०० रुपयाने वाढले. आंतरराष्ट्रीय तसचं देशातील वायदे वाढल्यानं, बाजार समित्यांमधील कापसाचे दरही वाढतील, असा अंदाज होता.
त्याप्रमाणं दोन दिवसांपासून काही बाजारांमध्ये सुधारणा दिसली. गुरुवारी राज्यातील आणि देशातील मोठ्या बाजारांमध्ये दर क्विंटलमागं वाढले होते. पण इतर छोट्या आणि मध्यम बाजारांमध्ये दर जैसे थेच होते.
त्यामुळं शेतकरीही संभ्रमात होते. तुम्ही दर वाढले म्हणता! पण आमच्या बाजारात तर भाव तशेच आहेत, असं अनेक शेतकरी म्हणत होते. आणि ते खरंही होतं.