देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरीभोवती फिरत आहे. यंदाही भाव दबावात ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर यंदा तुरीने पाणी फेरले. देशातील तूर उत्पादनात यंदा मोठी घट झाली होती. पण सरकार तुरीचा पुरवठा मागणी पूर्ण करु शकेल, असा विश्वास व्यक्त करत होते. सरकारच्या मते, देशातील तूर उत्पादन ३६ लाख टनांच्या दरम्यान राहील.
तर देशातील व्यापाऱ्यांकडे तुरीचा मोठा स्टाॅक आहे, असाही अंदाज सरकारने व्यक्त केला. पण प्रत्यक्ष तुरीच्या उत्पादनातील घट जास्त होती. शेतकरीही दरवाढीच्या अपेक्षेने टप्प्याटप्प्याने तूर विकत होते. त्यामुळं बाजारात तुरीचा पुरवठा सरकारच्या अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. तुरीच्या दारतील तेजी टिकून राहीली. त्यामुळे सरकारने आपला मोर्चा व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांकडे वळवला.
पण तरीही काही फायदा झाला नाही. आता शेवटी सरकारच तूर आयातीचा विचार करत असल्याचे अन्न सचिवांनी सांगितले. सराकरनेही तूर आयात केली तरी स्वस्त माल कुठे उपलब्ध आहे? भारताची मागणी पाहून तूर निर्यातदार देशांनीही तुरीचे भाव वाढवले.
म्यानमारमधून तूर आयात करायची म्हटलं तरी ८ हजार ५०० रुपयांच्या पुढेच दर पडत आहेत. त्यामुळे सरकारने आयातीचा निर्णय घेतला तरी सरकारला स्वस्त तूर मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

