सोयाबीन सात महिने मागे ठेऊनही दरात सुधारणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत. परिणामी देशातील बाजारात मे महिन्यातील सोयाबीन आवक सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर दबावात आहेत. यामुळे देशातही भावपातळी नरमली आहे.
देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढले होते. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने देसातील सोयाबीन उत्पादन यंदा १२४ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज जाहीर केला. गेल्या हंगामात मार्चनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत झाली होती.
सोयाबीनच्या भावाने ६ हजार रुपयांचा भाव मिळत होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे भाव सरासरी ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव होता. मार्चनंतर दरात आणखी सुधारणा होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते.
शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणात मागे ठेवले होते. पण मार्चनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात नरमाई येत गेली. मे महिन्यात तर सोयाबीनच्या वायद्यांनी हंगामातील निचांकी भावपातळी गाठली. सोयाबीनचे वायदे १३.२१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदेही ४०९ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते.
ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाले. ब्राझीलमध्ये आता ९८ टक्के सोयाबीन काढणी पूर्ण झाली. हे सोयाबीन बाजारात येत आहे. याचा दबाव सोयाबीन बाजारावर येत आहे.
भारताने महिल्या सात महिन्यांमध्ये सोयापेंडची चांगली निर्यात केली. पण एप्रिलनंतर सोयापेंडला मागणी कमी होऊन निर्यात मंदावणार असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. परिणामी सोयापेंडसाठी स्थानिक बाजारावरच अवलंबून राहावे लागेल.
त्यामुळे सोयाबीनचे दर दबावात आले. सध्या बाजारात दैनंदीन आवक ९० हजार क्विंटलच्या दरम्यान होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दरपातळी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव नरमले. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आय़ात झाली.
देशात खाद्यतेलाचे साठे निर्माण झाल्याने सोयाबीनवर दबाव आला आहे. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांकडूनही केली जात आहे. सरकारने आयातशुल्कात वाढ केल्यास सोयाबीनला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

