सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण पुन्हा जनावरांनी लम्पी स्कीन आजाराची (Lumpy Skin Disease) लागन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. लम्पी स्कीन निवारणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत 170 कोटी रुपये खर्च केल्याचे विखे पाटील म्हणाले.
राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढले
गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरु केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी
शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी
लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी असल्याचे विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले आहे, प्रत्येकानं त्यांचे संगोपन करावे, असे आवाहनही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.
शेतकऱ्यांना पॉवर टिलर आणि ट्रॅक्टरचे वाटप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, टॅक्टरचे वाटप देखील करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्यक्ष संवाद साधला. दरम्यान, जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना पॉवर टिलर आणि ट्रॅक्टरचे वाटप केले. तसेच महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मशीनजवळ जाऊन मशीनची पाहणी केली.
एका छताखाली 80 शासकीय विभागांचे माहितीचे स्टॉल
शासन आपल्या दारी अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 80 स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री तक्रार कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारींची दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले.