सध्या सुरु असलेल्या कांदाप्रश्नी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारसोबत आणि केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत धनंजय मुंडे उद्या चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती तरी काही तोडगा निघणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
शेतकऱ्यांना सुद्धा मालाचा योग्य बाजाराभाव मिळावा,यासाठी कृषिमंत्री मुंडे केंद्रीय कृषिमंत्री आणि वाणिज्यमंत्री यांना भेटणार आहेत. उद्या होणाऱ्या या बैठकीत आणखी इतर शेती प्रश्नांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
४० टक्के निर्यातकर आकारणीविरोधात बंद
केंद्र सरकारने कांद्यावर लादलेल्या ४० टक्के निर्यातकर आकारणीविरोधात नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने बंदचा निर्णय घेतला आहे. बंदच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील सर सर्व बाजार समित्या बेमुदत बंदावर ठाम आहेत. आशियातील सर्वांत मोठी असणारी कांदा बाजार समिती लासलगाव बाजार समितीच्या आवारात आज सोमवारी एकही ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी दिसला नाही.
पुणे, नाशिकमधील शेतकरी आक्रमक
केंद्राने आधी नाफेडने खरेदी केलेला स्टॉकचा कांदा बाजारात आणला. त्यानंतर लगेचच दोन दिवसांत कांदा निर्यातकर ४० टक्के केला. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील मंचर आणि खेड बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
किसान सभेचा बंद पाठिंबा
नाशिकमधील बाजार समिती बंदला नगर जिल्ह्यातील किसान सभेने जाहीर पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातील बाजार समित्या बंद ठेऊन रस्त्यावर उतरा, असे आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांच्याकडून करण्यात आले आहे.