पुरंदर तालुका हे सीताफळाचे आगार आहे. परंतु यंदा उन्हाळा तीव्र होता. त्यामुळे सीताफळाच्या आगाप (उन्हाळी) बहराचे उत्पादन तुलनेत फुलधारणेच्या वेळीच्या तापमानवाढीने परागीभवन कमी राहिले म्हणून उत्पादन कमी आहे. फळाचा आकारही कमी राहिला आहे.
तालुक्यात पाऊस कमी असल्याने फळवाढीला लगाम बसला. दुसरीकडे सीताफळाचे बाजारभावही तुलनेत पडले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत कसेबसे १५ ते २० कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांतच ४० कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे.
मागील काही वर्षे सीताफळ हंगामात ५० टक्के माल क्रमांक एकच्या प्रतीचा असायचा. तर दुसऱ्या प्रतीचा माल ३० टक्के आणि तिसऱ्या प्रतीचा किंवा भुगी प्रकारचा माल २० टक्के मिळत होता. आता निम्मा माल तिसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच भुगी प्रकारातील मिळतोय. क्रमांक एक प्रतीचा माल अगदी १० ते १५ टक्केच मिळतोय.
बाकी दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतीचा माल ३० ते ३५ टक्के मिळतोय. त्यामुळे सीताफळाचे दरही ३०० ते १८०० रुपये २० किलोच्या क्रेटमागे जेमतेमच आहेत, असे व्यापारी म्हस्कू खेडेकर, गिरीश काळे, किशोर काळे, सिद्धू खेडेकर, अजित पोमण, नीलेश टिळेकर, मनीष सोंडकर, शौकत भाई, विठ्ठल काळे, नितीन काळे आदींनी सांगितले.
उत्पादक शेतकरी बाळासाहेब टिळेकर, शंकर झेंडे, रामचंद्र खेडेकर, मुरलीधर झेंडे यांनी या निमित्ताने चांगल्या पावसाच्या व सीताफळ उत्पादन वाढीसह दर सुधारण्याच्या आशा आहेत, असे सांगितले.
सीताफळाचे गणित…
– पुरंदर तालुक्यातील सीताफळ क्षेत्र ः ५,५०० एकर
– एकरी झाडे १६०
– झाडांची संख्या ः ८ लाख ८० हजार
– एकरी झाडे १६०
– सरासरी दर ४० ते ६० रुपये किलो
– तालुक्याचे आर्थिक उत्पन्न ः १३२ कोटी रुपये किमान
फळांचा आकार व उत्पादन कमी का.?
– सीताफळात उन्हाळी (आगाप) बहर धरला, त्यास उन्हाळ्यातील तापमान वाढीने गाठले
– उन्हाळी बहरात तापमानाने आद्रर्ता कमी राहिली
– परागीभवन अपेक्षित झाले नाही
– फुले गळ झाली, फळांची संख्या कमी झाली
– जूनच्या पंधराव्यापर्यंत तापमान उच्च
– फळांची वाढ होण्याला वळवानंतर पावसाची जोड लाभली नाही
– सिंचनास अपेक्षित पाणी मिळाले नाही
विविध ठिकाणांचे दर
– सासवड (ता. पुरंदर) घाऊक बाजार ः १५ ते ९० रुपये किलो
– पुणे ः १५ ते ८० रुपये किलो
– वाशी (नवी मुंबई) ः २० ते ८० रुपये किलो
– परप्रांतात ः (दिल्ली व इतर) ः ४० ते १५० रुपये किलो

