आज २७ एप्रिल रोजी किसान सभेच्या राज्यव्यापी अकोले ते लोणी मोर्चाने आणखी एक मोठा विजय मिळविला. १९ जिल्ह्यांतील १५,००० हून अधिक शेतकरी, ज्यांत महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती, यांनी काल अकोले येथून कूच करून रात्री संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे मुक्काम केला होता.
राज्य शासनाच्या लगेच लक्षात आले की, इतका मोठा शेतकरी मोर्चा लोणी या राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या गावी जाऊन धडकणे आणि तेथे महामुक्काम आंदोलन सुरू करणे यामुळे राज्य सरकार जास्तच बदनाम होईल. त्यामुळे किसान सभेने निर्देशित केलेले तीन मंत्री आज दुपारी शासनाने संगमनेरला आंदोलकांसोबत चर्चेसाठी पाठवले.
महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलकांशी संगमनेर प्रांत कार्यालयात चर्चा केली. किसान सभेच्या प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, किसन गुजर व सर्व उपस्थित राज्य पदाधिकारी, सीटूचे डॉ. डी. एल. कराड, आणि नगर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
चर्चा सुमारे तीन तास चालली, आणि तुम्ही मंत्र्यांनी आपापल्या अखत्यारीतील किसान सभेच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. किसान सभेच्या आग्रहास्तव, २५ व २७ एप्रिलच्या दोन्ही वाटाघाटींची लेखी मिनिट्स लवकरच देण्यात येतील; आणि तिन्ही मंत्री धांदरफळ गावात येऊन सर्व आंदोलकांना संबोधित करतील, आणि कोणत्या मागण्या त्यांनी मान्य केल्या याची ते जाहीर घोषणा करतील.
त्यानुसार २७ एप्रिलला सायंकाळी धांदरफळ गावात एक प्रचंड जाहीर सभा झाली. तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक ढवळे होते, आणि बादल सरोज, डॉ. अजित नवले, तसेच तिन्ही मंत्र्यांनी तिला संबोधित केले.
किसान सभेच्या नेत्यांनी यावर भर दिला की हा विजय आपल्या सातत्याच्या संघर्षाचा विजय आहे, आणि त्यांनी किसान सभा अनेकपट जास्त मजबूत व व्यापक करण्याचे आवाहन केले. गगनभेदी घोषणांच्या गजरात हा मोर्चा स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले. हजारो शेतकरी स्त्री-पुरुष विजयाच्या आणि समाधानाच्या भावनेने आपापल्या गावी परतले.
डॉ. अशोक ढवळे
जे. पी. गावीत
उमेश देशमुख
किसन गुजर
रडका कलांगडा
चंद्रकांत घोरखाना
डॉ. अजित नवले
ReplyForward
|