बजेट कोलमडलं….. थोडे कुठे कांद्याचे बाजारभाव वाढले नाही तोच बजेट कोलमडलं म्हणून बोंबा मारणारे आणि त्याला खतपाणी घालणारे उथळ पत्रकार आता कुठे गायब झाले आहेत ? अशी विचारणा प्रमोद पानसरे यांनी केली आहे पुढे बोलताना ते म्हणाले कांद्याकडे नेहमीच राजकीय पीक म्हणून पाहिले जात आहे, कांद्यामुळे सरकार कोसळल्याच्या घटना सुध्दा घडलेल्या आहेत.
आज अक्षरशः उत्पादन खर्चाच्या निम्म्या किंमतीत कांदा विक्री करावा लागत आहे. नफा तर सोडाच, पण खर्च झालेले निम्मे भांडवल सुध्दा वसूल होत नाही. केंद्र सरकारची चुकीची धोरणे याला मुख्यतः कारणीभूत आहेत. राज्य सरकार सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. कृषी प्रधान देशात बळीराजाची क्रूर थट्टा चालू आहे. आर्थिक बजेट काय फक्त नोकरदार आणि हाय सोसायटीतील लोकांनाच असते काय ?.
कांद्यामुळे बजेट कोलमडले म्हणून बोंबा मारणारे आता काय पेट्रोल- डिझेलच्या वासाने बेशुद्ध झालेत काय ?. आज कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला असताना केंद्र व राज्य सरकार त्यांच्या आक्रोशाकडे कधी लक्ष देणार ?.कांदा उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहणार आहेत काय……?? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रमोद पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटना यांनी व्यक्त केली आहे.

