पुरंदर तालुक्यातील वाल्हेनजीक असणार्या वागदरवाडी येथे उसाच्या पिकाच्या वादातून पुतण्याला रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणार्या चुलत्याला जेजुरी पोलिसांनी अटक केली. भास्कर त्रिंबक भुजबळ (रा. वागदरवाडी, वाल्हे, ता. पुरंदर) असे त्याचे नाव आहे. स्वप्निल भुजबळ असे पुतण्याचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा नानासाहेब भुजबळ (वय 62) यांची वागदरवाडी येथे शेती आहे. त्यांचे दीर भास्कर भुजबळ यांनी या शेतात उसाचे पीक घेतले आहे.
उसाची तोड थांबविण्यासाठी शारदा भुजबळ व त्यांचा मुलगा स्वप्निल भुजबळ हे शेतात गेले असता, भास्कर भुजबळने अगोदर कर्जाचे पैसे द्या, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर स्वप्निलच्या अंगावर रॉकेल ओतून व पेटत्या टेंभ्याने जाळण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जेजुरी पोलिसांनी भास्कर भुजबळला अटक केली आहे. जेजुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पुंडलिक गावडे तपास करीत आहेत.