पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलियात गव्हाचं उत्पादन आधीच घटलंय. त्यातच आता युरोपियन युनियनमधील देशांना दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसिलनं यंदा जागतिक धान्य उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जगातील अनेक देशांना हवामान बदलाचा फटका बसतोय. त्याचा परिणाम मागील वर्षभरापासून शेतीवर जाणतोय. भारतातील गहू उत्पादन अतिउष्णतेमुळं घटलं. ब्राझील, अर्जेंटीनात दुष्काळी स्थितीमुळं सोयाबीन, मका गहू आदी पिकांना फटका बसला. आता अमेरिकेतही कमी पावसानं चिंता वाढवली. तर युरोपियन युनियनमध्ये भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. परिणामी युरोपियन देशांमधील गहू, बार्ली आणि मक्याचं उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळं २०२२-२३ च्या हंगामात जागतिक धान्य उत्पादन कमी राहील, असा अंदाज इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसील अर्थात आयजीसीनं व्यक्त केलाय.
आयजीसीच्या मते मागील हंगामात जगातिक धान्य उत्पादन २ हजार २९७ दशलक्ष टन झालं होतं. ते यंदा २ हजार २५२ दशलक्ष टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदा जागतिक धान्य उत्पादन २ टक्क्यांनी घटेल. मागील पाच हंगामात पहिल्यांदाच जागतिक धान्य उत्पादन कमी राहील, असंही आयजीसीनं म्हटलंय.
यंदा जागतिक तांदूळ उत्पादन वाढीची शक्यता आहे. मात्र गहू आणि मका उत्पादनातील घटीमुळं समस्या वाढू शकते. यंदा जागतिक गहू उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा दीड टक्क्याने कमी राहील. मागील हंगामात ७८१ दशलक्ष टन गहू उत्पादन झालं होतं. त्यात यंदा ११ दशलक्ष टनांनी घट होईल. म्हणजेच गहू उत्पादन ७७० दशलक्ष टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
मका उत्पादनही मागील वर्षीच्या तुलनेत २.५ टक्क्यांनी कमी राहील. मागील हंगामात १ हजार २१८ दशलक्ष टन मका उत्पादन झालं होतं. त्यात यंदा जवळपास २९ दशलक्ष टनांची घट येईल. म्हणजेच २०२२-२३ मधील जागतिक मका उत्पादन १ हजार १८९ दशलक्ष टनांवर स्थिरावेल, असंही आयजीसीनं आपल्या अहवालात म्हटलंय.
जागतिक धान्य उत्पादन कमी राहण्यासोबतच व्यापरही घटेल, असंही आयजीसीनं म्हटलंय. धान्याचा जागतिक व्यापार मागीलवर्षीच्या तुलनेत ३.८ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. मागील हंगामात ४०२ दशलक्ष टन धान्याचा जागतिक व्यापार झाला होता. मात्र यंदा व्यापार ४०६ दशलक्ष टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळं गहू आणि मक्याचा पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळं या दोन्ही धान्याचे दर वाढले आहेत. त्यातच भारतानं गहू उत्पादन कमी झाल्यानं निर्यात बंदी केली. त्यामुळं दरवाढ कायम राहिली. आता रशिया आणि युक्रेनमधून निर्यात सुरळीत होण्याची शक्यता असल्यानं गव्हाचे दर नरमले. मात्र मका अद्यापही भाव खातोय. त्यातच इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसीलनं यंदा धान्य उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळं धान्य दरातील वाढ पुढील वर्षभर कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
सोर्स : अग्रोवन