वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनात येतो. यामुळे पशुपासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. म्हणूनच पावसाळ्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी खालील काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
पावसाळ्यामध्ये गवताची उगवण क्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे जनावरांना खायला पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते. परंतु हे जनावरांसाठी अपायकारकसुद्धा आहे. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात व कोरडा चारा कमी खातात. पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते व तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते व जनावरांना हगवण लागते. म्हणून पावसाळ्यात हिरवे गवतासोबत वाळलेला कोरडा तंतुमय चारा सुद्धा खाऊ घालणे आवश्यक असते.
पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने हे वातावरण विविध प्रकारच्या जीवाणू तसेच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते व निरनिराळ्या जीवाणूंची आणि विषाणूंची झपाट्याने वाढ होऊन जनावरे जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगास बळी पडतात. बाजारात काही जीवाणू तसेच विषाणूजन्य रोगाविरुद्ध लसी उपलब्ध आहेत. त्यांचे पशुवैद्यकाच्या मदतीने जनावरांमध्ये योग्यवेळी लसीकरण करून घ्यावे. उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी. पावसाळ्यात जनावरांच्या वागणुकीवर कटाक्षाने नजर ठेवावी. रोगाचे लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून योग्य तो उपचार करता येईल. जीवाणूप्रमाणे कृमींना सुद्धा पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते व परिणामी जनावरे वेगवेगळ्या कृमींना बळी पडतात. कृमिपासून वाचविण्यासाठी प्रत्येक पशुपालकांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना कृमिनाशक औषधाची मात्रा द्यावी. पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वर्षभर ठराविक अंदाजपत्रकानुसार कृमिनाशक औषधे देत रहावे.
पोट फुगणे – हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते.
कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडची डावी बाजू फुग्यासारखी दिसते.
पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो. अशा वेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.
उपाय – पोटफुगी टाळण्याकरिता जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते व पोटफुगीची समस्या टाळता येते. जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते.
पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरावर वेळीच उपचार करता येतील. पोटफुगी आजारावर प्रथमोपचार म्हणून अर्धा लिटर गोडेतेलात 30 मि.लि. टर्पेंटाईन, 100 ग्रॅम सोडा व 5 ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावराला ठसका न लागता हळूहळू पाजावे.
खुरातील जखमा चिघळणे व त्यात किडे पडणे – पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे खुरांमध्ये जखमा होतात.
सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात.
असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगडते. परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दुग्धोत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होतो.
शेळ्या-मेंढ्यामध्ये अशा जखमा झाल्यास त्यांना धनुर्वात होतो.
उपाय – जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. जखम पोटॅशिअम परमॅगनेटने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.
पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार – पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पासारखे श्वजसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालच्या जबड्याखाली सूज येते, श्वासोच्छ्वास करायला त्रास होतो, जनावरास 104 ते 105 अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी 90 टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.
उपाय – पावसाळ्याच्या सुरवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी. त्याचप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे.
बुळकांडी – हा एक विषाणूजन्य अजार असून पॅरामिक्सो नावाच्या विषाणूमुळे होतो. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे संसर्गाचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. दुर्गंधीयुक्त जुलाब, जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर बारीक पुटकुळ्यांसारखे फोड येतात. ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून पाणी वाहते. डोळे लालसर होतात. तोंड येते, पातळ- चिकट- दुर्गंधीयुक्त शेण पडते, बऱ्याच वेळी दोन्हीमिश्रित शेणही पडते. शरीरातील पाणी कमी होऊन जनावरांना तीव्र अशक्तपणा येतो व ४ ते ८ दिवसांत जनावर दगावणे इ. लक्षणे दिसून येतात. शरीराचे तापमान शेवटी थंड पडणे, नाडी व श्वा्सोच्छ्वावस कमी होणे किंवा अगदी मंद होणे हा या रोगाचा शेवटचा टप्पा मानला जातो.
उपाय – प्रतिबंधात्मक उपचारामध्ये या आजाराविरुद्ध लसीकरण करणे व गोठ्यांची नियमित स्वच्छता करणे, तसेच लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे बांधणे इ. गोष्टींचा समावेश होतो.
आजारी जनावरांची विष्ठा गोठ्यापासून दूर ठेवून खोल पुरणे फायद्याचे ठरते. प्रतिजैविकांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात वापर करावा.
पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी –
१) पावसाळ्यात अस्वच्छता, ओलाव्यामुळे जनावरे विविध रोगांना बळी पडतात. पावसाळ्यात तापमान कमी असले, तरी हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा कायम राहतो. अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू व बुरशीची वाढ चांगली होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते.
२) पावसाळ्यात गोठ्यातील स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. गोठ्यात जर खड्डे असतील, तर ताबडतोब ते मुरूम टाकून बुजवावेत. मलमूत्राचा योग्य निचरा करावा. यासाठी गोठ्यात थोडा उतार करावा.
३) पावसाचे पाणी गोठ्यात साचणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या बाहेरील बाजूस गोणपाटाचे पडदे लावावेत, यामुळे जास्त गारव्याचासुद्धा त्रास होणार नाही.
४) गोठ्यातील जमीन कोरडी करण्यासाठी चुन्याची पावडर, गव्हाच्या किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर गोठ्यात अंथरावा, यामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेण्यास मदत होईल
५) पावसाळ्यात जीवजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे जनावरांना स्वच्छ ठेवणे, गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे.
६) गोठा जंतुनाशक द्रावणाने अधून-मधून स्वच्छ करावा, त्यामुळे माश्यांचा प्रादुर्भाव कमी होईल.
७) जनावरांना विविध आजार हे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीविजन्य असतात. पावसाळ्यात बाह्यपरजीवी इ.चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यामुळे जनावरांना सरा, थायलेरिऑसिस, बॅबेसिऑसिस, तसेच लहान जनावरांमध्ये ब्लू टंग, इ. सारखे आजार होतात.
८) जनावरांना लसीकरण करणे फार गरजेचे आहे. लसीकरणामुळे बऱ्याच आजारांना आपण आळा घालू शकतो. सर्व लहान-मोठ्या जनावरांमध्ये आंतरपरजीवींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशके पाजावीत.
९) या वातावरणात कासेचा दाह या आजाराचे प्रमाण वाढते. यासाठी दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर काळजी व स्वच्छता बाळगावी. दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावणाने कास स्वच्छ धुवावी. जनावरांच्या विशेषतः दुधाळू जनावरांची बसण्याची जागा गोठ्यात अतिशय स्वच्छ असावी.
१०) पावसाळ्यात वासरे बऱ्याच आजारांना बळी पडतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. लहान वासरांना पावसाळ्यात न्युमोनिया हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये वासरांना श्वास घेताना त्रास होतो, घसा व छातीतून श्वास घेताना खरखर असा आवाज येतो, ताप येतो. या रोगामुळे पावसाळ्यात वासरे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. वासरांना कोरड्या जागेत बांधावे. भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बांधावे. स्वच्छ पाणी प्यावयास द्यावे
११) पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. बरेचदा जास्त प्रमाणात चारा खाल्ल्यामुळे जनावरांना अपचन, हगवण, पोटफुगीसारखे आजार प्रामुख्याने होतात. पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा आणि पेंड द्यावी. पोटफुगीमध्ये अतिप्रमाणात कोवळे गवत खाल्ल्यामुळे त्वरित वायू तयार होतो. हा वायू पोटात जमा होतो, त्यामुळे जनावराची डावी कुस फुगलेली आढळते, जनावर सुस्त होते, जनावर रवंथ करीत नाही, वेदना होतात, जनावराला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी त्वरित जनावरांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावे.
१२) पावसाळ्यात जनावरे माजावर येण्याचेसुद्धा प्रमाण जास्त असते. त्यामुळे माजाच्या योग्य वेळी जनावरे कृत्रिम रेतनाद्वारे फळवून घ्यावीत.
१३) पावसाळ्यात जनावरांचे खाद्य ज्या ठिकाणी साठवून ठेवले आहे, तेथे पावसाचे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी; कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी लागते. जनावरांना असा चारा दिल्यास जनावरे आजारी पडतात. त्यामुळे जनावरांचा चारा, खाद्याची साठवणूक कोरड्या जागेवर करावी.
१४) पावसाळ्यात अनेक विषारी वनस्पती उगवतात व अजाणतेपणे ते खाऊ घातल्यास जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असते. शेतकरी जे गवात खाऊ घालतो त्या गवतांच्या मुळांमध्ये अनेक विषारी घटक असतात, त्यामुळे गवताची मुळे जनावरांच्या आहारात जाणार नाहीत याची काळजी सर्वच पशुपालकांनी घ्यावी.

