बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र वाढल्याने राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज (दि.२६) रोजी देखील राज्यात दमदार पावसाची शक्यता आहे. कोकणासह, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
सध्या कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज (ता. २६) रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील अनेक भागात पाऊस सुरु असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यात अद्यापही पावसाची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढवी लागत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा, दक्षिण कोकणापासून उत्तर केरळ सक्रिय आहे.