राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाने उघडीप दिली आहे. मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. आज (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ राज्यात सुरु आहे. तर अधूनमधून हलका पाऊस हजेरी देखील लावत आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप सह, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मराठवाड्याच्या सर्वच भागात पावसाने विश्रांती दिली आहे. यामुळे खुरपणी किटकनाशकांच्या फवारणीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस पडलेल्या ठिकाणी उघडीप दिल्याने पिकांची वाढ काही ठिकाणी चांगली आहे. काही ठिकाणी ही वाढ खुंटली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातही पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस पडत आहे. कोल्हापुरातील साळवण मंडळात ६८.३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ५६.५ मिलिमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा व पुणे, सांगलीच्या पूर्व भागात पावसाअभावी पिके सुकत आहेत.