कापूस बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिर दिसतो. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मात्र काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. तर वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कापसाचे भाव काहीसे नरमले होते. वायद्यांमध्ये दुपारपर्यंत भाव ५९ हजार ८२० रुपये प्रतिखंडीचा भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या आठवडाभरापासून ८५ सेंटभोवती फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ८४.२० सेंट प्रतिपाऊंडवर होते.
कापसाचा भाव स्थिरावल्याने बाजारातील आवकही स्थिर दिसते. बाजारात ७ हजार गाठींची आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडं देशातील कापूस लागवड आतापर्यंत २ टक्क्यांनी कमी दिसते. पिकाला कमी पावसाचा फटकाही बसत आहे. महत्वाच्या कापूस उत्पादक मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये जवळपास एक महिन्यापासून पाऊस नाही. याचा परिणाम कापूस पिकावर होताना दिसत आहे. कापूस उत्पादकता यंदा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात कापसाच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते? असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

