कापूस भावात आज अनेक ठिकाणी नरमाई दिसून आली. खरं तर सरकारनं हमीभाव जाहीर केल्यानंतर दरात वाढ होण्याची अपेक्षा होती. पण खरिपातील लागवडी सुरु झाल्या तरी अपेक्षित भाव मिळत नाही. तसं पाहिलं तर जून महिना म्हणजे बाजारासाठी ऑफ सिझन.
पण डिसेंबरपेक्षा जून महिन्यातील भाव कमी आहेत. कदाचित हे पहिल्यांदाच घडताना दिसत आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारनं दोन दिवसांपूर्वी कापूस हमीभावात ९ टक्क्यांची वाढ केली. लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपये हमीभाव मिळणार आहे. तर सध्याचे बाजारभावही याच पातळीदरम्यान आहेत. विशेष म्हणजेच जून महिन्यात कापसाचे भाव हमीभावाच्या दरम्यान असल्याची पहिलीचं वेळ असेल, असे शेतकरी आणि व्यापारी सांगतात.
सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मागील आठवड्यात कापसाच्या भावात चांगली वाढ झाली होती. पण दोन दिवसांमध्ये पुन्हा २०० रुपयांनी भाव नरमले. C
कापसाचे भाव जूनमध्ये दबावात असण्याला काही कारणं आहेत. खरं तर यंदा उत्पादन घटल्यानं चांगला भाव मिळणं अपेक्षित होतं. पण झालं उलटं. सध्या कापसाच्या उत्पादनावरूनही वेगवेगळी मतं आहेत. यंदा सीएआयचा अंदाज २९८ लाख गाठींचा आहे.
तर सीसीआय आणि सीओसीपीसी या दोन्हींचा अंदाज ३४३ लाख गाठींचा आहे. म्हणजेच दोन्हीच्या अंदाज ४५ लाख गाठींची तफावत आहे. कापूस अंदाजातील तफावतीचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आणखी खूप कापूस शिल्लक आहे, असं सातत्यानं सांगून दरावर दबाव ठेवला गेला.
गेल्या हंगामात मार्च महिन्यानंतर १० ते १२ हजारांचा भाव पाहिल्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी कापूस मागं ठेवला. यंदाही मार्चनंतर दरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण यंदा मार्चनंतर कापूस भावात घट झाली. मे महिन्यात तर निचांकी भाव मिळाला.
पण सध्याच्या भावापेक्षा कापूस दरात नरमाई येणार नाही. कारण आता शेतकऱ्यांकडे कापूस कमी आहे. बाजारातील कापूस आवक आता मे महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आली. पुढील काळात आवक आणखी कमी होईल. त्यातच खरिपातील लागवडींनाही उशीर होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुजरात आणि महाराष्ट्रात दोन आठवडे चांगल्या पावसाची शक्यता कमी आहे. म्हणजेच लागवडीचा वेग कमी राहील. माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातही पाऊसमान या दोन्ही राज्यांमध्ये सरासरी राहण्याचा अंदाज आहे.