पुणे- राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात सर्रासपणे काटामारी सुरू असून तातडीने यावर आळा घालण्यासाठी कारखान्यांचे काटे ऑनलाईन करून पेट्रोल कंपन्यांच्या धर्तीवर अद्यायावत सॉफ्टवेअर निर्माण करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली. तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विश्वासघात करून एफआरपीचे तुकडे केले आहेत. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटवू देणार नसल्याचा इशारा यावेळी दिला. राज्यातील थकीत एफआरपी संदर्भात चर्चा करण्यासाठी राजू शेट्टी यांनी पुणे येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात अद्यापही १५३६ कोटी रूपयांची थकीत एफआरपी आहे. या सर्व कारखान्यावर जप्तीची कारवाई करावी. सरकारने शेतकर्यांना विश्वासात न एफआरपी मध्ये तुकडे केले. गाळप हंगाम संपून ३ महिने उलटून गेले मात्र अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची पहिली उचल देखील दिली नाही. शेतकर्यांची फसवणूक होत असताना सरकार गप्प का आहे, असा सवाल शेट्टी यांनी केले. यावर शेखर गायकवाड यांनी थकीत एफआरपी ठेवलेल्या साखर कारखान्यांनी १५ टक्के व्याजासह शेतकर्यांचे थकीत पैसे द्यावेत, असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच साखर आयुक्त कार्यालयाने ऊस नोंदणीसाठी अद्यावत अॅप तयार केले असून शेतकर्यांनी ज्या कारखान्याला उसाची नोंद केली आहे. त्याची माहिती याद्वारे साखर आयुक्तालयास मिळणार आहे. शेतकर्यांचा ऊस गाळपास नकार देण्यासाठी संबंधित साखर कारखान्यांना त्या कारणासह सर्व माहिती त्यामध्ये नमूद करावी लागेल. राजू शेट्टी यांनी दोन टप्यात एफआरपीसाठी अनेक कारखान्यांनी शेतकर्यांकडून जोर जबरदस्तीने बोगस करार लिहून घेतले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर गायकवाड यांनी कोणत्याही शेतकर्यांबाबत असे प्रकार घडल्यास तातडीने माझ्याकडे तक्रारी द्यावेत. त्यावर तातडीने सुनावणी करून कारवाई केली जाईल, तसेच ऑनलाईन काटे करण्यासाठी एक महिन्यात अहवाल सादर करू असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश बालवडकर, अॅड. योगेश पांडे, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपुरे, डॉ. दिनेश ललवाणी आदी उपस्थित होते.