गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे सुरु आहे. खरीप पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या आलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून 73 हजार शेतकऱ्यांना 40.71 कोटींची भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
परभणीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे 83 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये विमा भरपाई म्हणून मंजूर करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांकडून रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. परभणीमधील शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये का होईना रक्कम मिळायला सुरुवात झाल्याने थोडाफार दिलासा मिळत आहे.
पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला 9 सप्टेंबर रोजी दिले होते.
त्यानुसार या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व 73 हजार 814 शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली.